Assembly Election Results 2022: देशात काँग्रेसला पर्याय बनणार AAP?; अरविंद केजरीवालांचा पुढील 'राजकीय प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 07:30 AM2022-03-11T07:30:35+5:302022-03-11T07:31:45+5:30

'आप'चे अरविंद केजरीवाल राष्ट्रीय राजकारणात यशस्वी झाले आहेत. त्यांनी पंजाबमध्ये केवळ काँग्रेसला हरवलंच नाही तर पूर्णपणे धुरळा उडवला आहे

Punjab Assembly Election Results 2022: AAP to be an alternative to Congress in India ?; Arvind Kejriwal's next 'political plan' | Assembly Election Results 2022: देशात काँग्रेसला पर्याय बनणार AAP?; अरविंद केजरीवालांचा पुढील 'राजकीय प्लॅन'

Assembly Election Results 2022: देशात काँग्रेसला पर्याय बनणार AAP?; अरविंद केजरीवालांचा पुढील 'राजकीय प्लॅन'

googlenewsNext

नवी दिल्ली – दिल्लीनंतर पंजाबमध्येही परिवर्तनाची लाट पाहायला मिळाली. याठिकाणी आम आदमी पक्षाने इतिहास रचत परंपरेला छेद दिला. बादल कुटुंब हारलं. कॅप्टन हरले. सिद्धूनेही अनेक निवडणुकीनंतर पराभव पाहिला. आपच्या विजयानंतर देशात सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसवर त्याचा परिणाम पाहायला मिळाला. त्यामुळे आता आम आदमी पक्ष हा काँग्रेसला पर्याय झाला आहे का? राष्ट्रीय पातळीवर आता मोदींना टक्कर देण्याचं काम अरविंद केजरीवाल करतील का? असा प्रश्न उभा राहू लागला आहे.(Punjab Election 2022)

दिल्लीची पार्टी बनली राष्ट्रीय?

पंजाबमध्ये ११७ जागांपैकी ९२ जागांवर विजय मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रभारी राघव चड्ढा इतके उत्साहित झाले आहेत की, त्यांनी आम आदमी पक्ष(AAP) राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला पर्याय बनत चालली आहे. त्यांचे विधान खूप महत्त्वपूर्ण आहे. आम आदमी पक्षाला दोनदा दिल्लीत विजय मिळाला आहे. या विजयानंतर आता आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेस पक्षाचा सुपडा साफ केला आहे. दिल्लीची पार्टी म्हणून हिणवणाऱ्या विरोधकांना आपच्या पंजाब विजयानं चांगलीच चपराक बसली आहे.

पंजाब हे छोटं राज्य नाही. याठिकाणचं राजकारणही लहान मुलांचं नाही. एकीकडे काँग्रेस तर दुसरीकडे अकाली दलाचं तगडं आव्हान होतं. पंजाबच्या राजकारणात बादल कुटुंबाची सक्रियता कुणी नाकारू शकत नाही. पाकिस्तानच्या सीमेशी जवळ असल्यानं पंजाब राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण राज्य आहे. परंतु इतकं आव्हान असतानाही अरविंद केजरीवाल(Arvind Kejariwal) यांच्या झाडूनं कमाल केली आहे. दिल्लीच्या बाहेर सत्ता मिळवण्यासाठी आपनं पंजाबमध्ये खूप वेळ घेतला. ज्या दिल्ली मॉडेलवरून आपनं दोनदा दिल्लीची सत्ता काबीज केली. त्याचेच उदाहरण समोर ठेवत पंजाबच्या जनतेचं मन जिंकण्याचा आपनं प्रयत्न केला.

दिल्ली, पंजाबनंतर आता पुढील प्लॅन काय?

'आप'चे अरविंद केजरीवाल राष्ट्रीय राजकारणात यशस्वी झाले आहेत. त्यांनी पंजाबमध्ये केवळ काँग्रेसला हरवलंच नाही तर पूर्णपणे धुरळा उडवला आहे. मुख्यमंत्री चन्नी दोन्ही मतदारसंघात पराभूत झालेत. सिद्धू हरले आहेत. सरकारमधील अनेक मंत्री त्यांची जागा राखण्यात अयशस्वी ठरलेत. त्याचा अर्थ असा की पंजाबमध्ये आपची लाट पाहायला मिळाली त्या लाटेत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. पंजाबच्या जनतेने परिवर्तन करत केजरीवाल यांचे स्वागत केले. त्यामुळे दिल्लीबाहेर सत्ता मिळवण्याची सुवर्णसंधी केजरीवाल यांना मिळाली.

आम आदमी पक्षाकडून दिल्ली बाहेर हातपाय पसरवण्यास सुरुवातीपासून प्रयत्न सुरू होते. पार्टीने याआधी यूपी, गोवा, उत्तराखंड, गुजरातमध्ये त्यांचे संघटन बांधलं. परंतु यूपीत अद्याप आपला मतदार बनवता आला नाही. उत्तराखंडमध्ये काँग्रेसविरुद्ध भाजपा लढाई झाली. गोव्यात ‘आप’चा जनाधार स्थिरावलेला नाही. त्यात पंजाबमधील मोठ्या विजयानं राष्ट्रीय स्तरावर आपनं मजबूत एन्ट्री घेतली आहे. मोदीविरोधात कुणाचं नेतृत्व द्यावं अशी चर्चा विरोधकांमध्ये आहेत. विरोधकांना एकजूट करण्याचं काम कोण करेल अशावेळी पंजाबमध्ये आपच्या विजयानं मोठे संकेत दिले आहेत. अरविंद केजरीवाल अनेक दिवसांपासून स्वत:ला राष्ट्रीय नेते बनवण्याचं स्वप्न पाहत आहेत. परंतु राष्ट्रीय नेत्यांच्या यादीत सध्या ममता बॅनर्जी, शरद पवार, चंद्रशेखर राव, अखिलेश यादव यासारख्या नेत्यांपर्यंत चर्चा राहिली आहे. मात्र पंजाबच्या विजयामुळे आगामी काळात आम आदमी पक्ष काँग्रेससाठी पर्याय बनण्याची शक्यता आहे

Web Title: Punjab Assembly Election Results 2022: AAP to be an alternative to Congress in India ?; Arvind Kejriwal's next 'political plan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.