'PM मोदी नेहरूंना जबाबदार ठरवतात, चुका सुधारत नाहीत...', पंजाबच्या जनतेला मनमोहन सिंगांचा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 02:49 PM2022-02-17T14:49:00+5:302022-02-17T14:50:01+5:30
पंजाबी भाषेत जारी केलेल्या एका व्हिडिओ संदेशात मनमोहन सिंग म्हणाले, आजची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे, कारण...
पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी (punjab elections 2022) माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी पंजाबच्या जनतेसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. मनमोहन सिंग म्हणाले, लोकांना आपली चांगली कामे माहीत आहेत. त्यांनी (भाजप) पीएम मोदींच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्री आणि पंजाबच्या जनतेचा अपमान केला आहे. आज तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. तर गरीब आणि गरीब होत चालला आहे.
पंजाबी भाषेत जारी केलेल्या एका व्हिडिओ संदेशात मनमोहन सिंग म्हणाले, आजची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे, कारण सरकारच्या धोरणांमुळे कोरोना काळात महागाई, बेरोजगारी वाढत आहे. मनमोहन सिंग म्हणाले, विद्यमान पंतप्रधान (नरेंद्र मोदी) आपल्या चुका सुधारण्याऐवजी देशाचे पहिले पंतप्रधान नेहरूंना दोषी ठरवत असतात.
आपल्या व्हिडिओ संदेशात मनमोहन सिंग म्हणाले, केंद्र सरकारने हे देखील समजून घेतले पाहिजे की, चेहरा बदलल्याने स्थिती बदलत नाही, जे काही खरे आहे ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बाहेर येतेच! मोठमोठ्या गोष्टी बोलणं सोपं असतं पण त्या अंमलात आणणं खूप अवघड असतं.
पंजाब की जनता के नाम पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह जी का संदेश। pic.twitter.com/EYkPWZObo2
— Congress (@INCIndia) February 17, 2022
माझ्यावर मूक, कमकुवत आणि भ्रष्ट असल्याचा आरोप करणाऱ्या भाजप सरकारच्या बी आणि सी टीमचा आज देशासमोर पर्दाफाश झाल्यामुळे मला दिलासा मिळाला आहे, असेही मनमोहन सिंग यांनी पंजाबला दिलेल्या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.
मनमोहन सिंग पुढे म्हणाले, आपण असे मानतो की, पंतप्रधानपदाची एक विशेष गरिमा आहे. यामुळे, इतिहासाला दोष देऊन आपले दोष कमी करता येणार नाहीत. तसेच, आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात आपण स्वतः अधिक बोलण्याऐवजी कामाला बोलू देणे पसंत केले. आपण राजकीय फायद्यासाठी सत्य झाकण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. देश आणि पदाची (PM) शान कधीही कमी होऊ दिली नाही, असेही सिंग म्हणाले.