मोगा : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंजाबमधील मोगा येथील एका सभेला संबोधित करताना एक मोठे आश्वासन दिले आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) सरकार आल्यास प्रत्येक महिलेला दरमहा 1000 रुपये दिले जातील. पेन्शन व्यतिरिक्त हे पैसे मिळतील. ही जगातील सर्वात मोठी महिला सक्षमीकरण मोहीम असेल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
याचबरोबर, माझे विरोधक म्हणतील पैसे कुठून येणार? फक्त पंजाबमधून माफिया संपवायचे आहे, पैसे येतील. मुख्यमंत्री विमान खरेदी करतात. मी खरेदी केली नाही. मला तिकीट मोफत मिळाले. केजरीवाल जे बोलतात तेच करतात. ही निवडणूक पंजाबचे भवितव्य बदलू शकते, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तसेच, यावेळी वडील किंवा पती कोणाला मत द्यायचे हे सांगणार नाही. त्यापेक्षा महिलाच ठरवतील कोणाला मतदान करायचे. यावेळी केजरीवालांना एक संधी देऊन बघा, असे घरातील सर्व महिलांनी सांगावे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.
एक नकली केजरीवाल फिरत आहे. मी जे वचन देतो. दोन दिवसांनी तोही तेच म्हणतो कारण तो नकली आहे. मी म्हणालो वीज मोफत केली तर तो म्हणतो वीज मोफत केली. सध्या लुधियानात भाषण सुरू होते. त्याने सांगितले 400 युनिट वीज मोफत दिली आहे. जर एका व्यक्तीचेही बिल शून्य आले असेल तर मला सांगा. संपूर्ण देशात वीज बिल शून्य करणे केवळ केजरीवालच करू शकतो. त्यामुळे नकली केजरीवालपासून सावध राहा, असेही अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
काल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरिद्वारमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी आम आदमी पार्टी जर सत्तेवर आला तर विविध धर्माच्या लोकांसाठी मोफत धार्मिक यात्रेची योजना सुरु करु, असे आश्वासन अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिले आहे. याआधी उत्तराखंडच्या दौऱ्यात अरविंद केजरीवाल यांनी शेतकऱ्यांना मोफत बीज आणि प्रत्येक घरासाठी तीनशे युनिट मोफत वीज अशी आश्वासने दिली होती.
दरम्यान, आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर उत्तरेकडील राज्यांमंध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. पंजाब, गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपा, काँग्रेस या प्रमुख पक्षासह आता आम आदमी पार्टीने देखील आपल्या विस्तार वाढवायला सुरूवात केली आहे.