लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने देशभरातील महामार्गांवर पाचशे मीटरच्या परिसरात दारूची दुकाने बंद झाली. मात्र, पंजाबमध्ये महामार्ग आणि आसपासचे हॉटेल, बार लवकरच पुन्हा दारू विक्री करू शकतील. राज्य सरकारने त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या दारूविक्री बंदीतून बाहेर काढण्याचा मार्ग तयार केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह राज्यातील उत्पादन शुल्क कायद्यात बदल करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशाद्वारे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या ५०० मीटर परिघात दारू विक्रीवर बंदी घातलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंजाब उत्पादन शुल्क कायद्याच्या कलम २६ अ मध्ये सुधारणा करण्यास हिरवा कंदिल दाखविण्यात आला. त्यामुळे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या ५०० मीटर परिघात येणारे हॉटेल, क्लब आणि बार हे दारू विकण्यावरील बंदीतून मुक्त होतील. तथापि, या परिघात दारूच्या ठेक्यावर ही बंदी लागू राहणार आहे. सरकार याबाबत कायदा बनविण्याची प्रक्रिया विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच सुरू करणार आहे.
पंजाबमध्ये हायवेवरील बार, हॉटेल मद्यविक्री करू शकणार
By admin | Published: June 20, 2017 1:32 AM