पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षी पंजाब दौऱ्यावर होते. ते तेथे विधानसभा निवडणुकीच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक अथवा हलगर्जीपणा झाला होती. याप्रकरणी आता एकूण सात पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यात फिरोजपूर जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक आणि दोन डीएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी 5 जानेवारीला ही घटना घडली होता.
यावेळी, शेतकरी आंदोलकांनी केलेल्या नाकाबंदीमुळे पंतप्रधानांचा ताफा सुमारे 20 मिनिटे उड्डाणपुलावरच अडकून राहिला होता. या हलगर्जीपणाबद्दल भाजप नेत्यांनी तत्कालीन चरणजीत सिंह चन्नी सरकारला लक्ष्य केले होते. तर पंतप्रधानांच्या प्रवासात शेवटच्या क्षणी बदल झाल्याचे काँग्रेसने म्हटले होते.
यानंतर, या सुरक्षा भंगासंदर्भात चौकशी करणासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक समिती नियुक्त केली होती. या समितीने सुरक्षा भंगासाठी पंजाब सरकारच्या काही अधिकाऱ्यांना जबाबदार धरले होते. भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने आता या चुकीबद्दल सात पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
या प्रकरणी, तत्कालीन फिरोजपूर पोलीस प्रमुख तथा आता भटिंडाचे एसपी गुरबिंदर सिंग यांना यापूर्वी निलंबित करण्यात आले होते. याशिवाय, राज्याच्या गृहविभागाच्या आदेशानुसार, डीएसपी दर्जाचे अधिकारी पारसन सिंग आणि जगदीश कुमार, पोलीस निरीक्षक जतिंदर सिंग आणि बलविंदर सिंग, उपनिरीक्षक जसवंत सिंग आणि सहायक उपनिरीक्षक रमेश कुमार यांनाही निलंबित करण्यात आले आहे.
संबंधित आदेशात, सर्वच्या सर्व सातही पोलीस कर्मचाऱ्यांना पंजाब सिव्हिल सेवा (दंड आणि अपील) नियम, 1970 च्या नियम 8 नुसार, कारवाई सामना करावा लागेल. या नियमांतर्गत पदोन्नती रोखण्यापासून ते सेवेतून बडतर्फ करेपर्यंत शिक्षा होऊ शकते.