चंडीगड : पंजाबच्याभगवंत मान (Bhagwant Mann) सरकारने सोमवारी आपला पहिला अर्थसंकल्प (Punjab Budget 2022) सादर केला. पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी विधानसभेत 2022-23 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, 1 जुलैपासून मोफत वीज देण्याचे आश्वासन पूर्ण करणार असल्याची घोषणा हरपाल सिंग चीमा यांनी पंजाब विधानसभेत केली. हरपाल सिंग चीमा म्हणाले की, 1 जुलैपासून दरमहा 300 युनिट मोफत वीज देण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
या वर्षी मार्चमध्ये आम आदमी पक्ष (आप) सत्तेत आल्यानंतर भगवंत मान सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी सादर केला. यावेळी हरपाल सिंग चीमा म्हणाले की, 1 जुलैपासून राज्यातील प्रत्येक घरात दरमहा 300 युनिट मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. आप सरकार सुशासनाचे मॉडेल प्रस्थापित करेल असेही हरपाल सिंग चीमा म्हणाले. ते म्हणाले की, आमचे सरकार भ्रष्टाचार खपवून घेणार नाही... आमच्या पक्षाचा जन्म भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने झाला आहे.
अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा म्हणाले की, सरकारी पोर्टल आणि ई-मेलद्वारे 20,384 सूचना प्राप्त झाल्यानंतर अर्थसंकल्प तयार करण्यात आला असून आरोग्य आणि शिक्षणासह विविध क्षेत्रांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. पहिल्या वर्षी आमचे लक्ष तीन मुख्य गोष्टींवर असेल - बिघडलेले वित्तीय आरोग्य सुधारणे, सार्वजनिक पैशाचा प्रभावी वापर सुनिश्चित करून सुशासनाची आश्वासने पूर्ण करणे आणि आरोग्य आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे.
शैक्षणिक अर्थसंकल्पात वाढपंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात पैशांची कमतरता असतानाही शैक्षणिक अर्थसंकल्पात वाढ केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत शैक्षणिक अर्थसंकल्प 17 टक्क्यांनी वाढले आहे. तंत्रशिक्षणाच्या अर्थसंकल्पामध्ये 48 टक्के आणि वैद्यकीय शिक्षणाच्या अर्थसंकल्पामध्ये 57 टक्के वाढ करण्यात आली आहे.
काय आहे शैक्षणिक बजेटमध्ये?पंजाब सरकारच्या शैक्षणिक अर्थसंकल्पामध्ये सरकारी शाळांच्या इमारतींची स्थिती सुधारणे, सर्व शाळांच्या सीमारेषा बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय देश-विदेशातील शिक्षकांचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, स्वच्छतेची व्यवस्था, डिजिटल क्लासरूम, मुलांना नोकरी शोधणारे नसून रोजगार निर्माण करणारे बनवण्यासाठी शिक्षण योजनाही जाहीर करण्यात आली आहे.
पंजाब अर्थसंकल्पाबाबत मनीष सिसोदियांचे ट्विट पंजाबमधील आप सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पावर, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट केले की, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या पहिल्या बजेटमध्ये पैशांची कमतरता असतानाही शैक्षणिक बजेटमध्ये शानदार वाढ केली आहे. पंजाबमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत शालेय शिक्षणाच्या बजेटमध्ये 17 टक्के, तांत्रिक शिक्षणाच्या बजेटमध्ये 48 टक्के आणि वैद्यकीय शिक्षणाच्या बजेटमध्ये 57 टक्के वाढ झाली आहे.