चंदिगड - पंजाब विधानसभेची निवडणूक आता काही महिन्यांवर आली आहे. दरम्यान, या निवडणुकीपूर्वी भाजपाने राज्यात आपला जनाधार वाढवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचदरम्यान, आज भाजपानेपंजाबच्या राजकारणात मोठा धमाका केला आहे. भाजपाने राज्यातील विरोधी पक्षांना सुरुंग लावताना दोन आमदार, एक माजी आमदार आणि एका खासदाराला पक्षात प्रवेश दिला आहे. त्याबरोबरच भारतीय संघातील धडाकेबाज फलंदाज असलेला माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यानेही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांनी आज भाजपाचे नेते गजेंद्रसिंह शेखावत आणि पंजाबचे प्रभारी दुष्यंत गौतम यांच्या उपस्थितीत भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले.
दरम्यान, भाजपामध्ये प्रवेश करणारे दोन्ही खासदार हे काँग्रेसमधील आहेत. काँग्रेसचे कादियाँ मतदारसंघातील खासदार फतेहगंज सिंग बाजवा आणि हरगोबिंदपूर येथील आमदार बलविंदरसिंग लाडी यांनी हात सोडून कमळ हाती घेतले आहे. त्यांच्यासोबत अकाली दलाचे माजी आमदार गुरतेज सिंग घुडियाना, माजी खासदार राजदेव सिंग खालसा, अकाली दलाचे नेते जगदीप सिंग, माजी न्यायाधीश मधुमीत सिंग आणि माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यानेही भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले आहे.
पंजाबच्या राजकारणाबाबतच्या जाणकारांनी सांगितले की, बाजवा यांचे भाजपामध्ये जाणे हे काँग्रेसला महागात पडू शकते. फतेहगंज सिंग बाजवा हे चंदिगडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रताप सिंग बाजवा यांचे भाऊ आहेत. कादियाँ विधानसभा मतदारसंघातून ते आमदार आहेत. तसेच दोन्ही भावांमध्ये चुरस आहे. काही दिवसांपूर्वी येथे नवज्योत सिंग सिद्धू यांनी सभा घेत फतेहजंग यांन निवडून देण्याचे आवाहन केले होते. मात्र काही दिवसांतच फतेहजंग यांनी पक्ष बदलल्याने काँग्रेसवर नामुष्की ओढवली आहे. दरम्यान, फतेहजंग हे अमरिंदर सिंग यांचे निकटवर्तीय असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच पंजाबमधील माझा भागात यांच्या प्रभाव आहे. त्याचा फायदा भाजपा आघाडीला होऊ शकतो.