पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून पंजाब लोक काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना करणारे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आता भाजपसोबत जाण्याची तयारी सुरू केली आहे. सोमवारी, अर्थात १९ सप्टेंबरला ते दिल्ली येथे भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा त्यांना भाजपचे सदस्यत्व देऊ शकतात. महत्वाचे म्हणजे, त्यांच्या भाजप प्रवेशाबरोबरच त्यांचा पक्षही भाजपमध्ये विलीन होईल.
यावेळी कॅप्टन अमरिंदर सिंग यांची मुलगी जय इंदर कौर, मुलगा रणइंदर कौर आणि नात निर्वाण सिंगदेखील भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. मात्र, त्यांची पत्नी परनीत कौर अद्यापही काँग्रेसच्या खासदार आहेत. त्यांच्या विरोधात अॅक्शन घेण्यात यावी, अशी मागणी नेहमीच काँग्रेसचे काही लोक करत असतात. याशिवाय, पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या सोबतच राज्यातील जवळपास अर्धाडझन माजी आमदारही भाजपमध्ये सामील होऊ शकतात. महत्वाचे म्हणजे, काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील जाखडदेखील आता भाजपमध्येच आहेत.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी याच आठवड्याच्या सुरुवातीला गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. तेव्हापासून कॅप्टन भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात होती. पंजाब विधानसभा निवडणुकीत अमरिंदर सिंग यांच्या पक्षाने भाजपसोबत युती करून निवडणूक लढवली, मात्र, त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. स्वत: कॅप्टन अमरिंदर सिंग यांचाही त्यांच्या पारंपारिक पटियाला या मतदारसंघात दारूण पराभव झाला. खरे तर, अमरिंदर सिंग यांची कन्या जय इंदर कौर यांनी स्वतःच यापूर्वी सांगितले होते, की पंजाब लोक काँग्रेस भाजपमध्ये विलीन करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे.