चंदीगड:पंजाबचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान आणि राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यासह राज्यातील अनेक रेल्वे स्टेशन उडवले जातील, अशी धमकी देण्यात आली आहे. कपूरथला स्टेसनच्या डीआरएमला हे पत्र पाठवण्यात आले आहे.
अनेक स्टेशन उडवण्याची धमकीमिळालेल्या माहितीनुसार, हे पत्र जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने लिहीले आहे. राज्यातील सुलतानपूर लोधी, लोहियान खास, फिरोजपूर कॅन्टोन्मेंट, फगवाडा, अमृतसर आणि तरनतारनसह अनेक रेल्वे स्थानके उडवून देण्याची धमकी पत्रात देण्यात आली आहे. मात्र, त्यावर कोणत्याही तारखेचा किंवा दिवसाचा उल्लेख केलेला नाही.
कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळपत्र वाचून सुलतानपूर लोधी रेल्वे स्थानकाच्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. याची गांभीर्याने दखल घेत स्टेशन मास्तरांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. पत्रात शाळकरी मुलाच्या इंग्रजी नोटबुकच्या पानावर हिंदी भाषेत धमकी लिहिली आहे. ज्या लिफाफ्यात पत्र आले आहे त्यावर टपाल तिकीट आहे, परंतु यावर कोणत्याही पोस्ट ऑफिसचा शिक्का किंवा तारीख लिहिलेली नाही.
सुपरवायजरला मिळाले पत्र सुलतानपूर लोधी रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर राजबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी 2.15 च्या सुमारास एक पोस्टमन पत्र घेऊन स्टेशनवर पोहोचला आणि हे पत्र पर्यवेक्षक विकास कुमार यांना मिळाले. पत्रावर त्यांचे (स्टेशन मास्तर) नाव लिहिले होते, म्हणून ते पत्र घेऊन लगेच त्यांच्याकडे आले. त्यांनी पत्र उघडून ते वाचले तेव्हा एका पानावर दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा एरिया कमांडर सलीम अन्सारी, जम्मू-काश्मीरसह कराची पाकिस्तान, जैश जिंदाबाद आणि पाकिस्तान जिंदाबाद असे लिहिले होते.
'आम्ही जिहादींच्या मृत्यूचा बदला घेऊ'दुसऱ्या पानावर 'खुदा मला माफ कर, आम्ही आमच्या जिहाद्यांच्या मृत्यूचा बदला नक्कीच घेऊ, आम्ही जालंधर रेल्वे स्टेशन, सुलतानपूर लोधी-लोहियान खास, फिरोजपूर कॅन्टोन्मेंट, फगवाडा, अमृतसर आणि तरणतारनसह पंजाबच्या अनेक रेल्वे स्थानकांसह जालंधरमधील देवी तालाब मंदिर, पियाला येथील काली माता मंदिर, फगवाडा येथील हनुमानगढी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, राज्यपाल, फिरोजपूर रेल्वे महाव्यवस्थापक सीमा शर्मा यांच्यासह अकाली दलाच्या नेत्यांना ठार मारणार आहोत,' असे पत्रात लिहीले आहे.