पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित (Banwarilal Purohit) यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. मात्र, राज्यपालांनी त्यांना नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री पदावर कायम राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर चरणजीत सिंग चन्नी यांनीही आम आदमी पार्टीला आवाहन केले आहे.
"मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे. त्यांनी मला आणि मंत्रिमंडळाला नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत काम करण्यास सांगितले. जनतेचा जनादेश मला मान्य आहे. पंजाबच्या जनतेच्या सेवेसाठी आपण सदैव उपस्थित राहू", असे चरणजीत सिंग चन्नी यांनी सांगितले. तसेच, "आम्ही आमचे कर्तव्य बजावत राहू आणि त्यांच्यामध्येच राहू. मी नवीन सरकारला आवाहन करतो की, गेल्या 111 दिवसांतील लोककल्याणकारी प्रकल्प आणि योजना सुरू ठेवाव्यात", असे चरणजीत सिंग चन्नी म्हणाले.
चरणजित सिंग चन्नी यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्यपाल आम आदमी पार्टीला सरकार स्थापनेचे निमंत्रण पाठवणार आहेत. दरम्यान, आम आदमी पार्टीने पंजाब विधानसभा निवडणूकीत 117 पैकी 92 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले आहे. त्यामुळे आता पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार बनणार आहे. निवडणुकीपूर्वीच आम आदमी पार्टीकडून भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते.
सत्ताधारी कॉंग्रेसचा दारूण पराभवगुरुवारी जाहीर झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत चरणजीत सिंग चन्नी आणि त्यांच्या अर्ध्याहून अधिक मंत्र्यांचा पराभव झाला. तर आम आदमी पार्टीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. आम आदमी पार्टीनेने विधानसभेच्या 117 पैकी 92 जागांवर विजय मिळवला, तर सत्ताधारी कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. चरणजित सिंग चन्नी यांनी रूपनगर जिल्ह्यातील चमकोर साहिब आणि बरनाला येथील बहादूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, परंतु दोन्ही जागांवर आम आदमी पार्टीच्या उमेदवारांकडून पराभूत झाले. चरणजीत सिंग चन्नी हे चमकोर साहिबचे विद्यमान आमदार होते. कॅप्टन अमरिंदर सिंग हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये चरणजीत सिंग चन्नी यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती.