महाराष्ट्रातील काँग्रेस नेते निधी संकलनावरून घुश्श्यात; पण पंजाबच्या CMने राम मंदिरासाठी दिले २ लाख!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 12:50 PM2021-03-09T12:50:16+5:302021-03-09T12:54:01+5:30
महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी राम मंदिराच्या देणगीवरून भाजपला घेरले असताना, दुसरीकडे मात्र पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राम मंदिर उभारणीसाठी दोन लाखांची देणगी दिली आहे.
लुधियाना : अयोध्येत भव्य राम मंदिर (Ram Mandir) उभारणीसाठी देशव्यापी देणग्या गोळा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेचा समारोप अलीकडेच करण्यात आला. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी राम मंदिराच्या देणगीवरून भाजपला घेरले असताना, दुसरीकडे मात्र पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राम मंदिर उभारणीसाठी दोन लाखांची देणगी दिली आहे. (punjab cm amarinder singh donated two lakhs for the construction of ram mandir)
राम मंदिर उभारणीसाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेचा समारोप रविवारी पंजाबमध्ये करण्यात आला. याचा पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राम मंदिर उभारणीसाठी दोन लाख रुपयांची देणगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या देणगीबाबत प्रांत संयोजक राम गोपाल यांनी त्यांचे आभार मानले आहेत. राम मंदिरासाठी पंजाबमधून आतापर्यंत ४१ कोटी रुपयांची देणगी जमा झाल्याची माहिती मिळाली आहे.
राम मंदिराला देणगी न दिल्याने नोकरीवरून काढले? RSS संचालित शाळेतील प्रकार
आकडा वाढू शकेल
राम गोपाल यांनी याबाबत बोलताना सांगितले की, पंजाबमधील नागरिकांनी राम मंदिरासाठी सढळ हस्ते देणग्या दिल्या आहेत. राज्यातून जमा झालेल्या देणग्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कारण अद्याप एकूण किती रक्कम जमा झाली, याचा निश्चित आकडा हाती आलेला नाही, अशी माहिती राम गोपाल यांनी दिली.
नाना पटोलेंची जोरदार टीका
दरम्यान, राम मंदिराच्या निधी संकलनावरून काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली. भगवान श्रीरामाच्या नावाखाली देणगी जमा करण्याचा ठेका भाजपला दिलाय का? ते कोणत्या नियमाखाली ही देणगी जमा करत आहेत? राम मंदिराच्या नावाखाली टोलवसुली सुरू आहे. केंद्र सरकारने याचे उत्तर द्यायला हवे, असा आरोप नाना पटोले यांनी विधानसभेत केला.
राम मंदिरासाठी घरोघरी जाऊन देणगी गोळा करणे बंद; केवळ 'या' ठिकाणी देता येईल दान
देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
श्रीराम मंदिर निर्माणासाठी निधी गोळा करणे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना वसुली वाटते. ज्यांना कधी श्रीराम कळलेच नाहीत, त्यांना श्रीराम सेवा काय कळणार! खंडणीखोरांना समर्पण हे कधीच कळले नाही आणि कळणारही नाही. श्रीराम हा आमचा धर्म आहे आणि कर्मही! खंडणी वसुली करणाऱ्यांना सेवा काय कळणार, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी केला.