नवी दिल्ली - देशात गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याच दरम्यान आता पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शेतकऱ्यांना पंजाबबाहेर आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच "शेतकऱ्यांनी दिल्ली, हरियाणामध्ये आंदोलन करावं, पण पंजाबमध्ये नको" असा सल्ला देखील त्यांनी केला आहे. "पंजाब सरकार हे शेतकऱ्यांसोबत आहे. त्यामुळे राज्यात कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणं टाळावं" असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. होशियारपूरच्या चब्बेवाल विधानसभा क्षेत्रातील मुखलियाना गावात 13.44 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या शासकीय महाविद्यालयाच्या पायभरणी कार्यक्रमावेळी त्यांनी असं म्हटलं आहे.
अमरिंदर सिंग यांनी "पंजाबमध्ये 113 ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत. हे आंदोलन राज्याच्या हिताचं नाही. यामुळे राज्याच्या आर्थिक प्रगतीवर विपरित परिणाम होतं आहे. दिल्ली आणि हरियाणात आंदोलन करणं योग्य आहे. पण पंजाबमध्ये 113 ठिकाणी धरणं धरून बसण्याचा आणि पंजाबची अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचा काही उपयोग नाही" असं म्हटलं आहे. तसेच "शेतकरी आपलं म्हणणं ऐकतील. कारण कायदे विधासभेत रद्द केले आहेत. त्या ठिकाणी राज्य सरकारने आपले कृषी कायदे पास केले आहेत. कायदे मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवले आहेत. मात्र दुर्दैवाने त्यांनी राष्ट्रपतींकडे अजूनही पाठवले नाहीत" असंही म्हटलं आहे.
"जे काही आमच्या सरकारच्या हातात आहे, ते आम्ही प्राधान्याने केलं आहे. अलीकडेच चंदिगडमध्ये शेतकरी संघटनेचे नेते भेटले. त्यांनी उसाची किंमत 325 रुपयांवरून 360 रुपये क्विंटल करण्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी त्याचवेळी मान्य केली. राज्यात आंदोलन करण्याऐवजी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे जेणेकरून हे शेतकरी विरोधी कायदे रद्द करता येतील" असं देखील पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"तालिबानशी चर्चा करणारं मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांशी का बोलत नाही, हा सत्तेचा अहंकार कशासाठी?"
हरियाणाच्या कर्नालमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पाण्याच्या तोफांचा मारा करण्यात आला याचा काँग्रेसने (Congress) निषेध केला आहे. "तालिबानशी चर्चा करणारे नरेंद्र मोदी सरकार (Modi Government) देशातील शेतकऱ्यांशी चर्चा का करत नाही?" असा बोचरा सवालही काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलवावं आणि तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. गेल्या 10 महिन्यांपासून गांधीवादी मार्गाने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना जाणूनबुजून भडकवून आणि आपापसात लढवण्याचा कट रचत आहे असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. "हा कट इथेपर्यंतच मर्यादित नाही. तर जवान आणि शेतकऱ्यांमध्ये जुंपवून देण्याचं षड्यंत्र रचलं आहे. कर्नालमध्ये हजारो शेतकऱ्यांवर पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला गेला. पण शेतकऱ्यांनी संयम सोडला नाही" असंही सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.