पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगात जाऊन भेट घेतली. यानंतर भगवंत मान हे खूप भावूक झाले. मुख्यमंत्री मान म्हणाले की, "दोन मुख्यमंत्र्यांना दहशतवाद्यांसारखं भेटू दिलं, ही हुकूमशाही आहे."
"ही भेट अर्धा तास होती, मनाला खूप वाईट वाटलं. जे हार्ड कोर गुन्हेगार असतात, त्यांच्यासारखी सुविधा देखील केजरीवालांना मिळत नाही. काचेतून मला फोनवर बोलायला लावलं, काचही खराब होती, चेहराही नीट दिसत नव्हता. केजरीवाल हे कट्टर इमानदार आहेत आणि त्यांना अशी वागणूक दिली जात आहे."
"मोहल्ला क्लिनिक बांधले आणि त्यामुळेच त्यांचा छळ केला जात आहे. तुम्ही केजरीवाल यांना अटक कराल पण त्यांच्या विचारांना अटक कशी करणार? केजरीवाल म्हणाले, माझी काळजी करू नका, मला सांगा पंजाबमध्ये काय परिस्थिती आहे. तेथे सुविधा उपलब्ध आहेत की नाही? मी त्यांना सांगितलं की, सर्व काही ठीक चाललं आहे. माझी काळजी करू नका, जनतेची काळजी करा, असं आमदारांना सांगितलं आहे."
तिहार तुरुंगात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आप खासदार संदीप पाठक म्हणाले की, पुढील आठवड्यापासून अरविंद केजरीवाल दोन मंत्र्यांना भेटीसाठी बोलावतील आणि समस्यांवर चर्चा करतील. अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी त्यांच्या निवासस्थानातून अटक केली होती.