नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुरूवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर भगवंत मान यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा केल्याचे सांगितले. तसेच, पंजाबमधील अंतर्गत सुरक्षेसाठी केंद्राने काल आम्हाला निमलष्करी दलाच्या 10 कंपन्या दिल्या आहेत. आज आम्ही आणखी 10 कंपन्यांची मागणी केली, जी गृहमंत्र्यांनी मान्य केली आहे, असे ते म्हणाले.
अंतर्गत सुरक्षेसाठी पंजाबला हवी ती मदत केंद्र सरकारकडून केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितल्याचे भगवंत मान म्हणाले. तसेच, कायदा व्यवस्थेवरून पटियालामध्ये, जी घटना घडली आहे. यावर सविस्तर चर्चा झाली. पक्ष बाजूली ठेवून राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत सहकार्य केले जाईल. शेतकऱ्यांचे गव्हाचे उत्पादन कमी झाल्यामुळे ५०० रुपये बोनस देण्यासंदर्भात मुद्दा उपस्थित केल्याचे भगवंत मान यांनी सांगितले.
याचबरोबर, आम्ही अँटी ड्रोन सिस्टमची मागणी केली आहे, तर अमित शाह यांनी आपण राष्ट्रीय सुरक्षेसाठी एकत्र काम करू, असे सांगितल्याचे भगवंत मान म्हणाले. तसेच, भाक्रा ब्यास व्यवस्थापन मंडळामध्ये (BBMB) बासमती पीक आणि पंजाब कोटा यासह इतर अनेक बाबींवरही चर्चा झाल्याचेही भगवंत मान यांनी सांगितले.
दरम्यान, पंजाबमधील विविध शेतकरी संघटनांचे शेतकरी गव्हाच्या कमी उत्पादनासाठी प्रति क्विंटल 500 रुपये बोनस आणि 10 जूनपासून संपूर्ण पंजाबमध्ये धानाची पेरणी सुरू करण्यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. मात्र, शेतकरी संघटनांनी बुधवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.