नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर भगवंत मान म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाबद्दल माझे अभिनंदन केले. तसेच, पंतप्रधानांनी मला राष्ट्रीय सुरक्षेसाठी मदतीचे आश्वासन दिले आहे. मी दोन वर्षांसाठी दरवर्षी 50 हजार कोटींची आर्थिक मदत मागितली आहे. पंजाबला पुन्हा देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणार असल्याचे भगवंत मान यांनी सांगितले.
गुरुवारी भगवंत मान आणि पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवर दोघांच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. भगवंत मान यांनी लिहिले आहे की, "आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि पंजाबच्या प्रश्नांवर चर्चा केली. पंजाबच्या ज्वलंत प्रश्नाबाबत केंद्र सरकारकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल अशी मला मनापासून आशा आहे."
दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यानंतर भगवंत मान यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची ही पहिलीच भेट आहे. आम आदमी पार्टी (AAP) नेते भगवंत मान यांनी 16 मार्च रोजी स्वातंत्र्य सेनानी भगतसिंग यांचे गाव खटकर कलान येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भगवंत मान यांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले होते.
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला बहुमतदरम्यान, पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने 117 जागांवर निवडणूक लढवली होती. 117 पैकी 92 जागा आम आदमी पार्टीने जिंकल्या आहेत. त्यामुळे आता पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार बनणार आहे. निवडणुकीपूर्वीच आम आदमी पार्टीकडून भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, नवज्योतसिंग सिद्धू, प्रकाशसिंग बादल आणि अमरिंदर सिंग यांच्यासह अनेक दिग्गजांचा आम आदमी पार्टीच्या उमेदवारांकडून पराभव झाला आहे.