नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal)यांच्या घरावरील हल्ला हे भ्याड कृत्य असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, पंजाबमध्ये आम आदमी पार्टीकडून झालेल्या दारूण पराभवामुळे भाजपचा राग स्पष्टपणे दिसत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला दिल्ली पोलिसांच्या उपस्थितीत झाल्याचा आरोपही भगवंत मान यांनी केला आहे. ते म्हणाले, आता स्पष्ट झाले आहे की भाजप फक्त आप आणि अरविंद केजरीवाल यांना घाबरत आहे.
दुसरीकडे, अरविंद केजरीवाल यांची हत्या व्हावी, अशी भाजपची (BJP) इच्छा असल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Deputy Chief Minister Manish Sisodia) यांनी केला आहे. बुधवारी पोलिसांच्या उपस्थितीत आणि पोलिसांसह भाजपाच्या गुंडांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचवण्यात आले. त्यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. सोबतच बूम बॅरिअर तोडण्यात आले. सर्व काही पोलिसांच्या उपस्थितीत घडले ही चिंतेची बाब आहे. हे सर्व भाजपच्या गुंडांनी केले आहे, असे मनीष सिसोदिया म्हणाले.
मनीष सिसोदिया म्हणाले की, "भाजप अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीत पराभूत करू शकत नाही. त्यामुळे भाजपला त्यांना मारायचे आहे. हा अतिशय विचारपूर्वक केलेला कट आहे. मी भाजपला सांगू इच्छितो की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हात लावण्याचा प्रयत्न करू नका. अशाप्रकारे हल्ले करून त्यांना मारण्याचा प्रयत्न करू, हे देश खपवून घेणार नाही."
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की मोठ्या संख्येने लोक मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर गोंधळ घालत आहेत आणि घोषणाबाजी करत आहेत. तसेच, आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेरील बॅरिकेड्स भाजपचे कार्यकर्तेच आंदोलनादरम्यान तोडत असल्याचे आम आदमी पार्टीचे म्हणणे आहे.