"...त्यामुळे गुजरातमध्ये आमचा पराभव झालेला नाही"; विराटचा उल्लेख करत भगवंत मान यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 01:10 PM2022-12-10T13:10:52+5:302022-12-10T13:29:33+5:30
Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आम आदमी पार्टीच्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकीतील कामगिरीबद्दल भाष्य केलं आहे.
गुजरातमध्ये भाजपानेआपले वर्चस्व कायम राखले आहे. भाजपाने 156 जागांवर विजय मिळवला आहे. विरोधकांचा भाजपाने सुफडा साफ केला. आता या विजयामुळे भाजपाला मोठा फायदा होणार आहे. भाजपाने आपलाच विक्रम मोडत नवा विक्रम केला आहे. याच दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आम आदमी पार्टीच्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकीतील कामगिरीबद्दल भाष्य केलं आहे.
"विराट कोहलीही प्रत्येक सामन्यामध्ये शतक करत नाही" असं भगवंत मान यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेस आणि नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला आहे. भगवंत मान यांना 'अजेंडा आज तक 2022' या कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे. "केजरीवाल यांच्याकडे किमान एवढी हिंमत तरी आहे की त्यांनी ही गोष्ट कागदावर लिहून दिली होती."
"आम्ही काँग्रेसप्रमाणे मैदान सोडून पळालो नाही. उलट आम्ही लढलो. आम्ही पंजाबमधून आता गुजरातमध्ये प्रवेश केला आहे. आता आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे" असं देखील भगवंत मान यांनी म्हटलं आहे. "आपला 13 टक्के मतं मिळाली. आमच्या या ठिकाणी शून्य जागा होता तिथून आम्ही पाचपर्यंत आलो आहोत."
"अगदी विराट कोहलीही प्रत्येक सामन्यामध्ये शतक करत नाही. त्यामुळे आमचा पराभव झालेला नाही" असं पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच मान यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही हल्लाबोल केला आहे. भाजपाने तीनपैकी केवळ एक निवडणूक जिंकली आहे, असा टोला लागवला. "भाजपाचा हिमाचल प्रदेशमध्ये आणि दिल्ली महानगरपालिका निवडणुकीमध्ये पराभव झाला" असंही मान यांनी म्हटलं आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"