दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच पंजाबच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. ही बैठक म्हणजे, एक प्रशिक्षण कार्यक्रम असल्याचेही सांगण्यात आले होते. यासंदर्भात विरोधकांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर 'रिमोट कंट्रोल'ने चालत असल्याचा आरोप केला होता. यावर भगवंत मान यांनी आता उत्तर दिले आहे.
मान म्हणाले, "गरज पडल्यास मी माझ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि इस्त्रायललाही पाठवीन. यावर कुणाला कशामुळे आक्षेप असावा. दिल्ली सरकार शिक्षण, वीज आणि आरोग्य विषयात तज्ज्ञ आहेत. मग मी अधिकाऱ्यांना का पाठवू नये?" याच आठवड्याच्या सुरुवातीला अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. मात्र, मान या बैठकीत उपस्थित नव्हते.
या बैठकीनंतर, विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने केजरीवालांवर 'रिमोट कंट्रोल'चा आरोप करत, मोठा वाद निर्माण केला. एवढेच नाही, तर माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हेदेखील या बैठकीवर टीका करणाऱ्यांमध्ये सामील होते. त्यांनीही ट्विट करत या बैठकीवर टीका केली होती. यावर मान म्हणाले, कुणी आक्षेप घेतला, कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणजे सर्व आहेत का?
'चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी ते कोठेही जाऊ शकतात' -मान म्हणाले, "विरोधी पक्ष कोणता आहे? कुठे आहे? केवळ विरोधासाठी विरोध करू नका. मीच अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी दिल्लीला पाठवले होते. ते चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी कोठेही जाऊ शकतात. मीच याची परवानगी दिली होती. यात चूक काय?"