पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पोट दुखीमुळे दिल्ली येथील अपोलो रुग्णालयात दाखल झाले आहेत. यातच त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ते दूषित पाणी पिताना दिसत आहेत. यामुळे, याच पाण्यामुळे तर त्यांची प्रकृती बिघडली नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. आम आदमी पार्टीच्या पंजाब युनिटकडून शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये भगवंत मान एका नदीतील पाणी पिताना दिसत आहेत.
पंजाब युनिटने शेअर केलेल्या व्हिडिओसोबत पंजाबी भाषेत एक कॅप्शन देण्यात आले आहे, की 'मुख्यमंत्र्यांनी सुल्तानपूर लोधी येथील पवित्र जल घेत गुरु नानक साहिब यांच्या भूमीला नमन केले. भगवंत मान आणि राज्य सभा सदस्य संत सिचेवाल यांनी पवित्र स्थानाच्या सफाईचा विडा उचलला आहे.
हा व्हिडिओ 17 जुलैला ट्विट करण्यात आला आहे. राज्यसभा खासदार बलबीरसिंग सिचेवालयांनी मुख्यमंत्र्यांना काली बेई नदीच्या स्वच्छतेसाठी बोलावले होते. याच वेळी भगवंत मान यांनी एक ग्लास पाणी पिले होते. या पाण्यात जवळपासच्या भागातील पाणीही येते. तेच पाणी काहीही संकोच न करता मान यांनी पिले होते. यानंतर काही दिवसांतच त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, आम आदमी पार्टी अथवा पंजाब सीएमओकडून यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारचे भाष्य करण्यात आलेले नाही.