हरियाणामध्ये काँग्रेस आणि आपमधील जागावाटप अडकले आहे. अशातच आपने आज सायंकाळपर्यंतचा अल्टिमेटम काँग्रेसला दिला असून आमच्या ९० उमेदवारांची यादी तयार असल्याचे म्हटले आहे. या यादीत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या पत्नीचेही नाव असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. रविवारी रात्री काँग्रेस आणि आपमध्ये जागावाटपासाठी बैठक झाली. यामध्ये काँग्रेस आपला सहा जागा देण्यास तयार होती. तर आपला १० जागा हव्या होत्या. आज सोमवारी आप-काँग्रेस आघाडीबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे.
रविवारी हरियाणा काँग्रेसचे प्रभारी दीपक बाबरिया आणि आप नेते राघव चढ्ढा यांच्यात ही बैठक झाली. काँग्रेसच्या सहा जागांच्या प्रस्तावावर आपने सहमती दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे. आज बाबरिया यांना बीपीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी निवडणुकीचे काम न करण्याची ताकीद त्यांना दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा जागावाटपाचे घोडे अडले आहे.
सुत्रांनुसार पंजाबला लागून असलेल्या पिहोवा, कलायत, जींद आणि एनसीआर गुरुग्राम, जुने फरीदाबाद आणि पानीपत ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आपला देण्यास काँग्रेस तयार झाले आहे. आपने पंजाबला लागून असलेली गुहला चीका ही जागाही मागितली आहे. परंतू, यावर दोन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता झाली नाही.
कुरुक्षेत्र जिल्ह्यातील पिहोवा विधानसभा मतदारसंघ पंजाबला लागून आहे. येथेच पंजाब सीएम भगवंत मान यांचे सासर आहे. या भागात पंजाबी लोकांचे प्राबल्य आहे. केजरीवाल आणि मान यांनी या भागात अनेक सभा घेतल्या आहेत. यामुळे मान यांची पत्नी डॉ. गुरप्रीत कौर किंवा सासरे या जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात असे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत आपने कुरुक्षेत्र मतदारसंघातून उमेदवार दिला होता. या मतदारसंघात ९ विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी गुहला चीका, पिहोवा, शहादाबाद आणि कलायत या मतदारसंघात आपला लीड मिळाले होते. तर उर्वरित पाच मतदारसंघात भाजपला लीड मिळाले होते. याच आधारे आपने या जागा मागितल्या आहेत.