चंदीगड : पंजाबच्या पटियालामध्ये निहंग शीखांच्या हल्ल्यात जखमी झालेले पोलीस अधिकारी हरजित सिंह यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी व्हिडीओ कॉलवरून चर्चा केली. हरजित सिंह यांच्यावर चंदीगडमधील रुग्णालयात उपचार सुरु आहे. निहंग शीखांच्या हल्ल्यात हरजित सिंह यांचा हात तुटला होता. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी साडे सात तासांच्या शस्त्रक्रियेनंतर हरजित सिंह यांचा हात पुन्हा जोडला आहे.
सोमवारी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी हरजित सिंह यांना व्हिडीओ कॉल केला आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यासंदर्भात कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ट्विट केले आहे. यामध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह म्हटले आहे की, "पोलीस अधिकारी हरजित सिंह यांच्याशी चर्चा केली. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. आज ज्या शौर्याने ते बोलत होते, त्याबाबत त्यांची स्तुती करण्यायोग्य आहे. ते लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो."
दरम्यान, रविवारी निहंगांचा (परंपारिक हत्यारं ठेवणारे आणि लांब कुर्ता घालणारे शीख) एक गट पांढऱ्या कारमधून भाजी मंडईत आला होता. मंडी बोर्डच्या अधिकाऱ्यांनी त्यांना प्रवेशद्वाराजवळ थांबविले आणि संचारबंदी पासबद्दल विचारणा केली. मात्र, ते थेट बॅरिकेडिंग तोडून पुढे गेले. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर निहंगांनी गाडीतून बाहेर पडून पोलिसांवर हल्ला केला. त्यात एका पोलीस अधिकारी हरजित सिंह यांचा हात कापला गेला. या अधिकाऱ्याचा हात अक्षरश: शरीरापासून वेगळा झाला होता. निहंगांच्या हल्ल्यात आणखी दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.