चंडीगढ – पंजाबकाँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप घडला आहे. याठिकाणी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा दिला आहे. अमरिंदर सिंग यांच्यासोबत २० आमदार आणि पंजाबचेकाँग्रेसचे काही खासदार राजभवनला उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टन अमरिंदर सिंग हे काँग्रेसच्या हायकमांडवर नाराज आहेत. आगामी काळात काँग्रेसला त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर संध्याकाळी कांग्रेस आमदारांची बैठक पार पडणार आहे. त्यात नव्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे. पंजाब मुख्यमंत्र्याचे माध्यम सल्लागार रवीन ठुकराल सांगितले की, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग पत्रकार परिषद घेणार होते. मुख्यमंत्रिपदावरुन राजीनामा दिल्यानंतर कॅप्टम अमरिंदर सिंग हे काँग्रेसला रामराम करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पंजाबमध्ये मोठ्या वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट शब्दात अपमान सहन करणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे राजीनाम्यानंतर अमरिंदर सिंह काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधी यांना फोन करून AICC द्वारे विश्वासात न घेता काँग्रेस आमदारांची बैठक बोलवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पक्षात अशाप्रकारे अपमानास्पद वागणूक दिली जात असेल मुख्यमंत्रिपदी राहण्याची इच्छा नाही असं त्यांनी सांगितले.
राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, ज्यांच्यावर हायकमांडला भरवसा आहे त्यांना पंजाबचं मुख्यमंत्री करावं. माझ्यावर नेतृत्वाचा विश्वास नाही असं मला वाटतं. सध्या मी काँग्रेसमध्येच आहे आणि भविष्यात योग्य वेळी निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितले.