पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या घरात कोरोनाचा (Coronavirus) शिरकाव झाला आहे. दरम्यान, चरणजीत सिंग चन्नी यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. परंतु त्यांची पत्नी आणि एका मुलाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. चन्नी आणि कोरोनाचं वृत्त त्यावेळी समोर आलं होतं जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी आञळल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आपल्या सुरक्षा ताफ्यातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं होतं, म्हणून ते ५ जानेवारी रोजी पंतप्रधानांची भेट घेऊ शकले नसल्याचंही सांगितलं होतं.
दरम्यान, यानंतर मुख्यमंत्री चन्नी काही सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहिले होते. यादरम्यान शनिवारी त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. परंतु त्यांच्या पत्नी आणि त्यांचा एका मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तर त्यांचा दुसऱ्या मुलाची महिनाभरापासून भेट झाली नव्हती. चन्नी आणि त्यांचा दुसरा मुलगा खरड गावात वास्तव्यास आहेत. तर सीएम चन्नी आणि त्यांचा दुसरा मुलगा हे सध्या चंडिगढमध्ये आहेत.
सुरक्षा त्रुटीवरून मोदींवर निशाणाचन्नी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा एक फोटो ट्विट केला आहे. "ज्यांना कर्तव्यापेक्षा प्राणाची अधिक चिंता आहे, त्यांनी भारतासारख्या देशात मोठी जबाबदारी स्वीकारू नये," असं त्या फोटोसोबत लिहिण्यात आलं आहे. दरम्यान, यापूर्वी त्यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधानांची सुरक्षा जाणूनबुजून धोक्यात घातल्याच्या भाजपच्या आरोपांवरही भाष्य केलं होतं.
"त्यांना कोणता धोका होता. त्यांच्यापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरही कोणी नव्हतं. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले बहुतांश लोकही पंजाबमधील होते," अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना दिली. "हे तथ्यहिन वक्तव्य आहे. हे पंजाबला बदनाम करण्याचं आणि राज्याला अस्थिर करण्यासाठी केलं जात आहे. जर पंतप्रधानांना कोणताही धोका असेल तर पहिली गोळी मी माझ्या छातीवर घेईन. यापेक्षा अधिक मी काय बोलू," असंही चन्नी म्हणाले.