नवी दिल्ली - पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Punjab CM Charanjit Singh Channi) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका नवदाम्पत्याला त्यांनी सुखद धक्का दिला आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी नवदाम्पत्याच्या भेटीसाठी चक्क आपला ताफा थांबवल्याची घटना समोर आली आहे. चरणजीत सिंग चन्नी हे भटिंडाच्या दौऱ्यावर असताना मंडी कलन गावात रविवारी त्यांना एक नवविवाहित दाम्पत्य दिसलं, यावेळी त्यांनी आपला गाड्यांचा ताफा थांबवला आणि गाडीतून खाली उतरत नवदाम्पत्याला त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री अचानक आल्याचं पाहून नवदाम्पत्यासह तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. पंजाब सरकारने देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भोवती पोलिसांचा ताफा असून नवदाम्पत्याच्या नातेवाईकांनीही गर्दी केल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी जोडप्याला शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिला. तसेच नातेवाईकांनी दिलेली मिठाई देखील खाल्ली. त्यांनी नवरा-नवरीशी संवाद साधला. लग्नाबाबत विचारपूस केली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
चंदीगढ-कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात काँग्रेससमोर मोठं राजकीय संकट उभ ठाकलं होतं. अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर अनेक नेत्यांची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरू होती. माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांनीही मुख्यमंत्रीपद स्विकारण्यास नकार दिल्यानंतर सुखजिंदरसिंग रंधावा यांचं नाव जवळ-जवळ निश्चित मानलं जात होतं. पण, काँग्रेसने सर्व बड्या नेत्यांना बाजुला करत चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे चर्चेत होती. पण, काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठीचं नवं नाव जाहीर केलं आहे. पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी चरणजीत सिंग चन्नी यांची निवड करण्यात आली.
कोण आहेत चरणजीत सिंग चन्नी?
चरणजीत सिंग चन्नी हे रामदासिया ह्या शीख समाजाचे नेते आहेत. अमरींदरसिंग यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी औद्योगीक आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. चमकूर साहीब या मतदारसंघातून ते तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. 2015 ते 2016 दरम्यान ते पंजाबचे विरोधी पक्ष नेते होते.