चंडीगड - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. काँग्रेसचे काही बडे नेते आणि माजी मंत्र्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या चंडीगड दौऱ्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये काँग्रेसच्या चार ज्येष्ठ नेत्यांनी आणि काही माजी मंत्र्यांनी भाजपा नेते सुनील जाखड यांची भेट घेतल्याचे दिसत होते. त्यामुळे ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.
दरम्यान, ही चर्चा नंतर खरी ठरली. हा व्हिडीओ भाजपाचे नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामध्ये तेसुद्धा दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिसत असलेले माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजकुमार वेरका, बरबीर सिंह सिद्धू, सुंदर शाम अरोडा आणि गुरप्रीत सिंह कांगड यांचा समावेश आहे.
मोहाली येथून तीन वेळा आमदार झालेले बलबीर सिद्धू काँग्रेसच्या मागच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते. तर रामपुरा फूल येथून तीनवेळा आमदार झालेले गुरप्रीत कांगड महसूलमंत्री होते. तर वेरका हे माझा विभागातील प्रमुख दलित नेते आहे. तसेच तेसुद्धा तीनवेळा आमदार राहिले होते. मागच्या सरकारमध्ये ते सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याक कार्यमंत्री होते. तर होशियारपूरचे माजी आमदार सुंदरशाम अरोडा काँग्रेसच्या मागच्या सरकारमध्ये उद्योग आणि वाणिज्यमंत्री होते. हे सर्व नेते २०२२च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते.
दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, बरनाला येथून काँग्रेसचे माजी आमदार केवल ढिल्लों हेसुद्धा भाजपामध्ये दाखल झाले आहेत. त्याशिवाय अकाली दलाचे माजी आमदार सरूप चंद सिंगला यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपा नेते अमित शाह हे चंडीगडमध्ये आहेत. तिथे ते राज्यातील भाजपा नेत्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते खेलो इंडिया युथ गेम्सचं उदघाटन तरणार आहेत.