Delhi Assembly Election 2025 Result: सत्ताधारी आम आदमी पक्षाला भुईसपाट करीत भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभेवर आज भगवा फडकविला आहे. भाजपने ४८ जागांवर दणदणीत विजय मिळविला. तर आपला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले. कॉंग्रेस पक्षाला या निवडणुकीतही खाते उघडता आलेले नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. परंतु, काँग्रेसचा हा भोपळाही आम आदमी पक्षाला भोवला आहे. अनेक जागांवर काँग्रेसला मिळालेल्या मतांमुळे आपचे उमेदवार थोडक्यात पराभूत झाले आहेत. त्यातून खुद्द अरविंद केजरीवालही सुटू शकले नाहीत.
भाजपने दिल्लीची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढविली होती. तर, गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीचे व्यवस्थापन सांभाळले होते. भाजपने निवडणुकीच्या प्रचारात भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांसह खासदारांची फौज उतरविली होती. यात आपचे पानिपत झाले. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून ३० हजार ८८ मते मिळवत अरविंद केजरीवाल यांचा ४०८९ मतांनी पराभव केला. यानंतर आता आम आदमी पक्षात मोठ्या घडामोडी घडू शकतात. तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान वेगळा विचार करू शकतात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे भगवंत मान काही ऐतिहासिक निर्णय घेऊन आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का देऊ शकतात, असे काही दावे करण्यात आले आहेत.
एकनाथ शिंदेंच्या पावलावर भगवंत मान ठेवणार पाऊल? पंजाबमध्ये खेला होणार?
पंजाबमधील काँग्रेस नेते प्रताप सिंह बाजवा यांनी याबाबत काही दावे केले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता पंजाबमध्ये आम आदमी पक्षात मोठी उलथापालथ होऊ शकते, असा दावा बाजवा यांनी केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आम आदमी पक्षात मोठी बंडखोरी करू शकतात. पंजाबमधील ३० हून अधिक आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहे आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार असल्याचेही बाजवा यांचे म्हणणे आहे.
भगवंत मान केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात
दिल्लीतील पराभवानंतर पंजाबमधील भगवंत मान सरकार टिकणे कठीण आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आधीच दोन गटांमध्ये विभागला आहे. पंजाबमधील आम आदमी पक्ष दिल्लीच्या नेतृत्वाशी चांगला ताळमेळ ठेवण्यास सक्षम नाही. आता दिल्लीतील परभावामुळे ‘आप’चे दिल्लीतील नेतृत्व पंजाबवर जास्त लक्ष केंद्रीत करेल. पण हे मुख्यमंत्री भगवंत मान सहन करणार नाहीत. त्यामुळे आम आदमी पक्षात नेतृत्वासाठी संघर्ष होईल आणि फूट पडेल. पंजाब ‘आप’ आणि दिल्ली ‘आप’ यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरु आहे. मुख्यमंत्री भगवंत मान हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात आहेत. भगवंत मान हे आम आदमी पक्षाच्या फुटीत एकनाथ शिंदे यांच्यासारखी भूमिका घेऊ शकतात, असे बाजवा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंजाबमध्ये २०२२ च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला. ११७ जागा असलेल्या पंजाब विधानसभेत आम आदमी पक्षाने ९२ जागा जिंकल्या होत्या. मुख्यमंत्री भगवंत मान सरकारला कोणताही धोका नसल्याचे दिसत आहे. असे असले तरी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आम आदमी पक्षावर काँग्रेस नेत्यांनी टीका केली असून, अनेक दावे-प्रतिदावे केले जात असल्याचे पाहायला मिळत आहेत.