चंदीगड : पंजाबमधीलकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पत्र लिहिले आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या चार पानांच्या पत्रात 13 मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या 13 मुद्द्यांमध्ये ड्रग्ज, कृषी, वीज, सरकार आणि वीज कंपन्या यांच्यातील करार रद्द करणे तसेच इतर काही गोष्टींमध्ये न्याय मिळावा यांचा समावेश आहे. मागासवर्गीयांचा विकास, रोजगार, सिंगल विंडो सिस्टिम, महिला आणि तरुणांचे सबलीकरण, दारु आणि अवैध खाणकाम याविरोधात कारवाई यावरही त्यांनी लक्ष वेधले आहे. (Punjab Congress Punjab Navjot Singh Sidhu Charan Jit Singh Channi Sonia Gandhi Punjab Elections)
नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा मागे घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी पत्र लिहिले आहे. गेल्या काही दिवसात त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पंजाबचे प्रभारी हरीश रावत आणि पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली होती. तसेच, आपल्या अडचणी त्यांनी पक्षासमोर मांडल्या होत्या. याशिवाय, पक्षाने 2007 मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी केलेल्या घोषणांची पूर्तता करायला हवी, अशी मागणी नवज्योतसिंग सिद्धू यांनी केली आहे.
दरम्यान, पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या महिन्याभरात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर चरणजित सिंग चन्नी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धूंनी राजीनामा दिला होता. आता त्यांची मनधरणी करण्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठी यशस्वी झाले असून राजीनामा मागेही घेतला आहे.
28 सप्टेंबरला दिला होता राजीनामा28 सप्टेंबरला नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले होते की, ते पक्षाची सेवा करत राहतील. तसेच, पत्रात लिहिले होते की, "कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची घसरण तडजोडीने सुरू होते, मी पंजाबचे भविष्य आणि पंजाबच्या कल्याणाच्या अजेंडाशी तडजोड करू शकत नाही."