"पक्ष चुकीच्या हातात; सिद्धू यांच्या मुर्खपणाच्या, सरकारविरोधी वक्तव्यांचं समर्थन करणं कठीण"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 04:27 PM2021-12-06T16:27:17+5:302021-12-06T16:36:14+5:30
Congress Pratipal Singh Baliawal : सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला असून त्यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासोबत काम करणं शक्य नसल्याचं म्हटलं आहे.
नवी दिल्ली - पंजाबकाँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. पंजाबकाँग्रेसचे प्रवक्ते प्रितपाल सिंग बलियावाल (Congress Pratipal Singh Baliawal) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना पक्षाची पंजाब युनिटची कमांड चुकीच्या हातात असल्याचं कारण त्यांनी दिलं आहेत. तसेच बलियावाल हे हरयाणा, हिमाचल प्रदेश काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक आणि पंजाब काँग्रेसचे वरिष्ठ मीडिया विश्लेषक देखील होते. सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला असून त्यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासोबत काम करणं शक्य नसल्याचं म्हटलं आहे.
बलियावाल यांनी राजीनामा पत्रात "प्रवक्ता म्हणून पाकिस्तानशी संबंधांबद्दल मूर्खपणाची, पक्षविरोधी आणि सरकारविरोधी वक्तव्ये आणि विधाने यांचे समर्थन करणे माझ्यासाठी खूप कठीण झाले आहे" असं म्हटलं आहे. तसेच "पक्षाने संघटन मजबूत करण्यासाठी विविध व्यासपीठांवर दिलेल्या जबाबदाऱ्यांचा मी सन्मान केला आहे. मात्र, आता पक्षाने पंजाबची कमान चुकीच्या हातात दिली आहेत" असं देखील प्रितपाल सिंग बलियावाल यांनी म्हटलं आहे.
"सिद्धू यांनी पाकिस्तानशी संबंधांसह सरकारविरोधी केलेल्या वक्तव्याचा प्रवक्ता म्हणून बचाव करणे कठीण"
"नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानशी संबंधांसह मूर्खपणाची, पक्षविरोधी, सरकारविरोधी केलेल्या वक्तव्याचा प्रवक्ता म्हणून बचाव करणे खूप कठीण झाले आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सुनील कुमार जाखड यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याची आपल्या पक्षाची क्षमता होती. मुख्यमंत्री चरनजीत सिंग चन्नी पक्षाची प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु तुम्ही सिद्धूची प्रवक्तेपदासाठी निवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र रोज सिद्धू नवनवीन ट्वीट करून मुख्यमंत्र्यांचं महत्त्व कमी करत आहेत."
"आम्ही काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिलो"
"अकाली राजवटीतही त्यांनी माझ्या कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल केले गेले आणि माझा व्यवसाय उद्ध्वस्त केला, पण तरीही आम्ही काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिलो. पक्षाने जगदीश टायटलर यांना महत्वाचं पद दिल्याने मी पुन्हा दुखावला गेलो. म्हणून, मी राष्ट्रीय समन्वयक, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश किसान काँग्रेसच्या प्रभारी आणि पंजाब काँग्रेसच्या वरिष्ठ मीडिया पॅनेलच्या जबाबदारीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे" असं बलियावाल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.