चंदीगड : पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेसने दणदणीत विजय मिळविला असून, अकाली दल व भाजप यांचा धुव्वा उडाला आहे. संध्याकाळपर्यंत सातपैकी सहा महापालिकांत व सर्व जिल्हा परिषदांत काँग्रेसला बहुमत मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्ते जोशात आहेत. देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा मोठा फटका भाजप व अकाली दलाला बसल्याचे दिसत आहे. अकाली दल दुसऱ्या क्रमांकावर दिसत आहे. नगरपालिकांच्या मोजणीतही काँग्रेसच आघाडीवर आहे. काही ठिकाणी गुरुवारी मतमोजणी होईल. भटिंडा, होशियारपूर, कपुरथळा, पठाणकोट, बटाला व अबोहर या महापालिकांमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. भटिंडामध्ये काँग्रेसला तब्बल ५३ वर्षांनी घवघवीत यश मिळाले आहे. मोगा महापालिकेत ५० पैकी २० जागी काँग्रेस तर १५ जागी अकाली दलाचे उमेदवार विजयी झाले आहेत. आम आदमी पक्षाचे चौघे तर १० जागी अपक्षांनी बाजी मारली आहे. भाजपला इथे केवळ एकाच जागी विजय मिळाला आहे.
निकालांमुळे काँग्रेसला मिळाली नवसंजीवनीस्थानिक स्वराज्य संस्थांत अपेक्षेपेक्षाही घवघवीत यश मिळाल्याने काँग्रेसला ग्रामीण भागांत नवसंजीवनी मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दिलेला पाठिंबा आणि त्यासाठी आवश्यक ते पाठबळ देण्याचा फायदा पक्षाला मिळाला. आज इतिहास घडला, अशा प्रतिक्रिया देत काँग्रेस नेत्यांना सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. खासदार सनी देओल यांच्या लोकमसभा मतदारसंघात भाजपला एकही जागा मिळालेली नाही, हे उल्लेखनीय.
ग्रामीण भागांतही बाजी- काँग्रेसने नगरपालिकांमध्येही बाजी मारली आहे. जवळपास सर्व पंचायत समित्याही काँग्रेसच्या ताब्यात आल्या. इतका दणदणीत विजय काँग्रेसला बहुधा पहिल्यांदाच मिळाला आहे. - अकाली दलाने आपला पराभव मान्य केला मात्र या निकालांबाबत भाजपने प्रतिक्रिया दिलेली नाही.
अधिक फटका भाजपला बसला - कृषी कायद्यांना विरोध करीत अकाली दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडला होता. - आंदोलानाचा अकाली दलापेक्षा अधिक फटका भाजपला बसला आहे.