Punjab Crime :पंजाबच्या अमृतसरमधून हादरवणारी बातमी समोर आली आहे. अमृतसरमध्ये दोन तरुणांनी एका अनिवासी भारतीयावर घरात घुसून गोळ्या झाडल्या. या घटनेत अनिवासी भारतीय गंभीर जखमी झाला आहे. जखमीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कारची आरसी काढण्याच्या बहाण्याने हल्लेखोर घरात घुसले होते. त्यानंतर आरोपींनी अनिवासी भारतीयावर गोळ्या झाडल्या. हा सगळा धक्कादायक प्रकार घरातल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अमृतसरच्या मकबूलपुरा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या डाबुर्जी भागात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. सकाळच्या सुमारात दोन हल्लेखोरांनी एनआरआयच्या घरात घुसून गोळीबार केला. ज्यात एनआरआय गंभीर जखमी झाला आहे. घरातल्या मुलाने हात जोडून आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. खंडणीसाठी हे आरोपी घरात घुसल्याची माहिती समोर आली आहे. गोळी लागल्याने जखमी झालेल्या एनआरआयला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सकाळी सात वाजता हल्लेखोर घरात घुसले. हल्लेखोरांनी आधी कुटुंबीयांशी काही मुद्द्यावरून वाद घातला. नंतर खिशातून बंदुक काढली आणि एनआरआय सुखचैन सिंग यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबार होताच आरडाओरडा झाला. घरातील महिला व मुलगा हात जोडून आरोपीला रोखण्याचा प्रयत्न करत होते. हल्लेखोरांनी घरात तीन गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला.
सुखचैन सिंगचा मुलगा आरोपींना हात जोडून थांबण्याचा प्रयत्न करत होता. मात्र हल्लेखोरांनी कुणाचेही ऐकलं नाही. माझ्या वडिलांना मारू नका, तुम्हाला पैसे दिले जातील, अशी विनवणी मुलगा हात जोडून करत होता. नंतर हल्लेखोरांचे पिस्तूल मध्येच अडकले आणि संधी पाहून ते तिथून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच मकबूलपुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी हरपाल सिंग रंधवा हे सीआयए कर्मचाऱ्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेचा तपास सुरू केला. घटनास्थळावरून पोलिसांनी तीन काडतुसे जप्त केली आहेत.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत हल्लेखोरांची तपास करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनिवासी भारतीय असलेल्या सुखचैन सिंग यांना धमक्या येत होत्या आणि त्यांच्याकडून खंडणीही मागितली जात होती. मात्र, पोलिसांनी हा दावा फेटाळला असून तपास सुरू असल्याचे म्हटलं आहे. सध्या पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.