नवी दिल्ली - पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू आपल्या वादग्रस्त विधानांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. नको त्या डायलॉगबाजींमुळे आपल्याच सरकारमधील मंत्र्यांच्या निशाण्यावर सध्या सिद्धू आहेत. 'अमरिंदर सिंग हे माजी लष्कर कॅप्टन आहेत. राहुल गांधी हेच माझे कॅप्टन आहेत', असे विधान सिद्धू यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. या विधानानंतर पंजाब सरकारमधील मंत्र्यांनी सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सोमवारी (3 डिसेंबर) पंजाब कॅबिनेटची बैठक होणार आहे. बैठकीत या मुद्यावर मोठा निर्णय येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुपारच्या सुमारास ही बैठक होणार आहे.
पंजाबमध्ये 'पोस्टरवॉर' पंजाब सरकारमधील तीन मंत्री, ग्रामविकास मंत्री राजिंदर सिंग बाजवा, महसूल आणि पुनर्वसन मंत्री सुखविंदर सिंग सरकारिया तसंच क्रीडा मंत्री राणा गुरमीत सिंग सोढ़ी यांनी सिद्धूंवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. राज्य सरकारमधील जवळपास 10 मंत्र्यांनी सिद्धूंच्या 'कॅप्टन' संदर्भातील विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे मंत्री रवनीत सिंग बिट्ट यांनी तर पंजाबमधील सर्व गल्लीबोळ्यात सिद्धूंविरोधात पोस्टरबाजी केली आहे. 'पंजाबचा कॅप्टन, हाच आमचा कॅप्टन', असा आशय असलेल्या पोस्टरवर त्यांना पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा फोटो आहे.
('भाजपानं देशाला दिलेत तीन मोदी ; नीरव, ललित अन् अंबानींच्या मांडीवर बसलेले नरेंद्र मोदी')
दरम्यान, आज पंजाब कॅबिनेटची बैठक होणार आहे, तर नवज्योतसिंग सिद्धू निवडणुकीच्या प्रचारासाठी राजस्थानमध्ये आहेत. सिद्धू आज नागौरमध्ये असल्या कारणामुळे बैठकीत सहभागी होणार नाहीत. पण जनसभेनंतर ते पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अमरिंदर सिंग हे माजी लष्कर कॅप्टन आहेत. याचा संदर्भ घेऊन सिद्धू यांनी म्हटले होते की, राहुल गांधी हेच माझे कॅप्टन आहेत. या विधानावरुन नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. ''सिद्धू हे अमरिंदर यांना कॅप्टन समजत नसतील, तर त्यांनी नैतिक जबाबदारीनुसार मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा'', अशी मागणी पंजाब सरकारमधील मंत्र्यांकडून होऊ लागली आहे.दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याला पाकिस्तानला पाठविलेले नव्हते, असे नवे स्पष्टीकरण नवज्योतसिंग सिद्धू यांनी शनिवारी दिले आणि आधीच्या आपल्या वक्तव्यावरून त्यांनी घूमजाव केले. करतारपूर कॉरिडॉरच्या पायाभरणी समारंभाला हजेरी लावण्यासाठी सिद्धू पाकिस्तानला गेल्याने वाद निर्माण झाला आहे. पण ‘राहुल गांधी यांनीच आपल्याला पाकिस्तानला जायला सांगितले होते, असा दावा सिद्धू यांनी केला होता. त्यावरून नवा वाद निर्माण होताच, सिद्धू यांनी घूमजाव केले.