चंदीगड : कोरोनाची साथ जोरात असताना लाखो लोकांना मुंबई व अन्य शहरातून आपापल्या घरी जाण्यासाठी सर्व मदत करणारे अभिनेते सोनू सूद यांनी प्रथमच राजकीय भाष्य केले आहे. त्यामुळे ते राजकारणात उतरणार, अशी चर्चा सुरू झाली. ते पंजाबमधील मोगा शहरातील आहेत.
पंजाबला मेवा खाणाऱ्या राजकारण्यांची आवश्यकता नाही, असे सोनू सूद यांनी म्हटले आहे. जे दिलेली आश्वासने पूर्ण करतील, असेच नेते राज्याला हवेत. राजकीय नेत्यांकडून आश्वासने पूर्ण करू अथवा राजीनामा देऊ, असा करारच मतदारांनी करायला हवा. जे नेते ठरलेल्या काळात आश्वासने पूर्ण करणार नाहीत, त्यांचा राजीनामा मंजुरीसाठी जनतेनेच संबंधिताना पाठवावा, असेही त्यांनी तीन मिनिटाच्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
केजरीवाल यांचीही घेतली होती भेट
सोनू सूद काही महिन्यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटले होते. त्यावेळीच ते आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा होती. पण तसे घडले नाही. आपने पंजाबमधील विधानसभेच्या सर्व जागा लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यांना त्यासाठी प्रभावी चेहरा हवा आहे. तो चेहरा सोनू सूद यांचा असू शकतो, असे अनेकांना वाटते. त्यामुळेच सोनू सूद यांच्याकडे येथील लोकांचे लक्ष लागले आहे.