चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या नातेवाईकाच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. या कारवाईत ईडीने भूपेंदर सिंह हनी आणि भूपेंदर यांच्या जवळचे संदीप कपूर यांच्या घरामधून अनुक्रमे 6 आणि 2 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. या कारवाईत ईडीने संपत्तीशी संबंधित काही कागदपत्रेदेखील जप्त केले आहेत. पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं असताना मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकावर ईडीने कारवाई केल्याने सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी देखील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नातेवाईकांच्या घरावर धाडी टाकण्यात आल्या होता. अशाच प्रकारे काँग्रेसचे मंत्री आणि नेत्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा दबावातंत्राचा सामना करण्यास आम्ही तयार आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी दिली आहे. तर राहुल गांधी यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
"ईडीकून धाड टाकणे हे भाजपाचे सर्वात आवडते शस्त्र, ते अनेक गोष्टी लपवतात"
ईडीकून धाड टाकणे हे भाजपाचे सर्वात आवडते शस्त्र आहे. भाजपा अनेक गोष्टींना लपवू पाहत आहे. आम्हाला कशाचीही भीती नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. मागील काही दिवसांपासून ईडीकडून वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. अवैध पद्धतीने रेतीचे उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना ईडीने लक्ष्य केलं आहे. मंगळवारी ईडीने अनेक लोकांच्या घरावर छापेमारी केली. यामध्ये चन्नी यांच्या नातेवाईकांचादेखील समावेश आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी चंदीगड, मोहाली, पठाणकोट, लुधियाना अशा महत्त्वाच्या ठिकाणी छापेमारीची कारवाई केली. या कारवाईत ईडीसोबत सीआरपीएफचे जवानदेखील होते. 2018 साली नवाशहर पोलिसात एक एफआयआर दाखल करण्यात आली होती. याच तक्रारीची दखल पोलिसांनी घेतलेली आहे. त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.