यदु जोशीअमृतसर : सोहना सिंग अन् मोहना सिंग ही अजब भावांची गजब जोडी राहते अमृतसरच्या पिंगलवाडा सोसायटीत. हे दोघे भाऊ एकमेकांना जोडूनच जन्माला आले आणि आजवर त्यांचा सोबतच जीवनप्रवास सुरू आहे. ते उत्तम गायकदेखील आहेत. पंजाबची निवडणूक २० फेब्रुवारीला होतेय; पण हे दोघे मतदान केंद्राधिकारी असल्याने १९ तारखेलाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.कारण मतदानाचा हक्क बजावत असलेले हे दोघे बंधूदेखील आहेत. सोहना-मोहना सिंग या जगावेगळ्या बंधूंची शुक्रवारी अमृतसरमध्ये भेट झाली.
दिलखुलास गप्पा मारताना त्यांनी राजकारणावरील चर्चेला मात्र बरोबर फाटा दिला. आम्ही राजकारणावर बोलू नाही शकत, मतदान केंद्राधिकारी आहोत ना! असे सोहनाने किंचित हसत सांगितले. लोक समजूतदार असतात, बरोबर मतदान करतात अशी पुस्तीही त्यांनी जोडली. दोघेही पंजाबच्या विद्यमान सरकारबद्दल कृतज्ञ आहेत. कारण, या सरकारने त्यांना पंजाब राज्य वीज महामंडळात नोकरी दिली आहे. एकमेकांना जुळलेले हे १९ वर्षीय जुळे भाऊ यावेळी केवळ पहिल्यांदा मतदानच करताहेत असे नाही तर ते मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. या दोघांचे मतदान एकमेकांना दिसू नये यासाठीची खबरदारी निवडणूक आयोग घेणार आहे.
तुमचे स्वप्न काय, या प्रश्नात सोहना सिंग म्हणाला, आम्हाला दोघांनाही नामवंत गायक व्हायचे आहे. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या मुंबईतील अकादमीत ते शिकतात; पण सध्या ऑनलाइन क्लास सुरू आहे. गेल्या महिन्यात हे शंकर महादेवन यांना भेटले होते.
साधी राहणी... सोहनाच्या शरीराच्या भागात जखम झाली, काही लागलं तर त्याला वेदना होतात. तसेच मोहनाबाबतही घडते. मोहना म्हणाला बरेचदा याला झोप लागते, मी जागा असतो; पण मी त्याला त्रास देत नाही. मोबाइल बघत असतो. दोघांचे पोट एकच आहे; पण एकाने जेवण करून दोघांचे पोट भरत नाही. दोघांनाही एनर्जी हवी असते त्यामुळे दोघांनाही जेवावे लागते. दोघे जुळलेले जुळे असलो तरी आमचे भावविश्व अगदीच वेगळे आहे, आमच्या आवडीनिवडीदेखील बऱ्याच बाबतीत वेगळ्या आहेत, असे सोहनाने सांगितले.
सोहना-मोहना यांना जन्म दिल्लीच्या कृपलानी इस्पितळात १४ जून २००३ रोजी झाला; पण जन्मताच त्यांना मातापित्यांनी सोडून दिले होते. पिंगलवाडा अनाथाश्रमात त्यांचा सांभाळ झाला. दोघांनी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. दोघांची राहणी अगदी साधी आहे. विचार मोठा हवा, राहणीचे काय एवढे, अशी भावना दोघांनीही बोलून दाखविली.