शरद गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पंजाबमधील आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान हे फक्त कॉमेडियन नाहीत, अन्यथा पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात २२ लाखांपैकी ९३ टक्के मते त्यांना मिळाली नसती.
महाविद्यालयीन काळापासूनच स्टँड अप कॉमेडी सुरू केली होती. लाफ्टर चॅलेंज टीव्ही शो जिंकल्यानंतर त्यांच्याकडे टीव्ही व चित्रपटांच्या ऑफरची रांग लागली. तरीही त्यांनी सामाजिक सेवा करण्यास प्राधान्य दिले.
पंजाबच्या वेगवेगळ्या भागांत कॉमेडी शो करताना त्यांनी जल प्रदूषणातून बालकांच्या हाडामध्ये आजार पसरताना पाहिला. तेव्हा त्यांनी २००६ मध्ये लोक लहर ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली. कॉमेडी शो करून मिळालेल्या पैशातून ते बालकांवर उपचार करतात. २०११मध्ये ते मनप्रीत बादल यांच्या संपर्कात आले. तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचे पुतणे व तत्कालीन वित्तमंत्री मनप्रीत यांनी त्यावेळी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन पंजाब पीपल्स पार्टी स्थापन केली होती.
असे पोहोचले संसदेत : भगवंत मान यांना आम आदमी पार्टी आवडली. २०१४ मधील संगरूर लोकसभा निवडणूक त्यांनी २.११ लाखांनी जिंकली व लोकसभेत आपल्या हजरजबाबीपणामुळे तसेच शायराना विनोदांमुळे त्यांनी मने जिंकली. २०१९ मध्ये संगरूरमधून विजयी होऊन लोकसभेत गेले.
उत्तर देणे सोडले : दोन वर्षांपूर्वी त्यांनी दारू न पिण्याची शपथ व्यासपीठावर घेतली होती. आपण खरेच दारू सोडली आहे का, असे विचारले असता, खास अंदाजात ते म्हणतात, मी अशा आरोपांना उत्तर देणे सोडले आहे.