नवी दिल्ली: देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरदारपणे सुरू आहे. उत्तर प्रदेश, गोवासह पंजाबमधील निवडणुकीवरही देशाचे लक्ष लागले आहे. काँग्रेसला सत्ता राखण्यात यश मिळते, की आम आदमी पक्ष गडाला सुरुंग लावतो, याकडे राजकीय विश्लेषकांच्या नजरा लागल्या आहेत. यातच आता प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी सदिच्छा व्यक्त करत, विडंबन करणे, उपहासात्मक टीका करणे माझे कामच असल्याचे राजू श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले आहे.
भगवंत मान यांनी आणि राजू श्रीवास्तव यांनी जवळपास एकाच कालावधीत आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. भगवंत मान यांची राजकारणात येण्यापूर्वी प्रसिद्ध कॉमेडियन म्हणून ख्याती होती. याबाबत बोलताना राजू श्रीवास्तव म्हणाले की, द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये आम्ही एकत्र होतो. भगवंत मान खूप मिश्किल आहेत. राजकारणी आमच्यासारख्या कॉमेडियन व्यक्तींची दखल घेत आहेत. त्यांना देश सांभाळण्याची संधी देत आहेत, हे पाहून आनंद वाटतो, असे त्यांनी नमूद केले.
भगवंत मान पंजाबचे मुख्यमंत्री व्हावेत
आम आदमी पक्षाने भगवंत मान यांना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार केले आहे. भगवंत मान यांनी पंजाबचे मुख्यमंत्री व्हावे, हीच माझी सदिच्छा आहे. भगवंत मान यांच्यावर मी एक व्हिडिओ केला होता. ते माझे चांगले मित्र आहेत. पण, कॉमेडियन म्हणून मी त्यांच्यावर खूपच टीका केली. मात्र, उपहासात्मक टीका-टिपण्णी करणे माझे कामच आहे. एक कॉमेडियन म्हणून तसे केले. तो व्हिडिओ भगवंत मान यांनीही पाहिला होता आणि तेही खूपच हसले होते, अशी आठवण राजू श्रीवास्तव यांनी सांगितली. ते आजतकशी बोलत होते.
दरम्यान, पंजाबमधील आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान हे फक्त कॉमेडियन नाहीत, अन्यथा पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात २२ लाखांपैकी ९३ टक्के मते त्यांना मिळाली नसती. पंजाबच्या वेगवेगळ्या भागांत कॉमेडी शो करताना त्यांनी जल प्रदूषणातून बालकांच्या हाडामध्ये आजार पसरताना पाहिला. तेव्हा त्यांनी २००६ मध्ये लोक लहर ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली. भगवंत मान यांना आम आदमी पार्टी आवडली. २०१४ मधील संगरूर लोकसभा निवडणूक त्यांनी २.११ लाखांनी जिंकली.