नवी दिल्ली: पंजाबमध्ये काही महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी(Punjab Election) आम आदमी पक्षाला(AAP) मोठे यश मिळताना दिसत आहे. WWE सारख्या आंतरराष्ट्रीय खेळामध्ये छाप पाडून जगभर नाव कमवणारा द ग्रेट खली उर्फ दलीप सिंग राणा(The great Khalli) आम आदमी पार्टीमध्ये सामील होऊ शकतो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी दलीप सिंह राणासोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यानंतर खली राजकारणात एंट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
अरविंद केजरीवाल यांनी दलीप सिंग राणासोबत मिळून पंजाबचे चित्र बदलू असे म्हटले आहे. त्यांनी ट्विट केले की, 'मी दलीप सिंह राणा यांची भेट घेतली. द ग्रेट खली या नावाने प्रसिद्ध असलेल्या दलीप राणाने भारताला जगभरात ओळख मिळवून दिली आहे. आम आदमी पक्षाने दिल्लीत शिक्षण, आरोग्य, पाणी आणि वीज या विषयांवर केलेले काम दलीप राणा यांना आवडले आहे. आता भविष्यात पंजाबचेही चित्र बदलून टाकू.' या ट्वीटद्वारे अरविंद केजरीवाल यांनी द ग्रेट खलीच्या आम आदमी पार्टीत प्रवेशाचे संकेत दिले आहेत.
यापूर्वी आपसाठी काम केले आहेदलीप राणाने आम आदमी पार्टीत प्रवेश करण्याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. मात्र अरविंद केजरीवाल यांच्या पुढील पंजाब दौऱ्यावर दलीप राणा अधिकृतपणे पक्षात प्रवेश करू शकतात. दरम्यान, दलीप राणा यांनी 2017 च्या विधानसभा निवडणुकीतही आप उमेदवारांचा प्रचार केला होता. दलीप राणा हे पंजाब पोलिसात कर्मचारी राहिले आहेत. दलीप राणा यांनी पंजाब पोलिसची नोकरी सोडून WWE मध्ये प्रवेश केला होता. याशिवाय, बॉलिवूडमध्येही हात आजमावला आहे.