नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘मिशन पंजाब’ला प्रारंभ केला आहे. गांधी यांचे गुरुवारी अमृतसरमध्ये विशेष विमानाने आगमन झाले. त्यांनी सुवर्ण मंदिरात माथा टेकला आणि पंगतीमध्ये बसून जेवण केले. नंतर ते श्री दुर्ग्याणा मंदिर आणि भगवान वाल्मिकी तीर्थमध्येही गेले. याच दरम्यान अकाली दलाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल (Harsimrat Kaur Badal) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या राहुल गांधींचा खिसा कोणी कापला आहे का? असा सवाल उपस्थित करत टोला लगावला आहे. यावरून सध्या राजकारण तापलं आहे.
हरसिमरत कौर बादल यांच्या एका ट्विटवरून राजकीय युद्ध सुरू झाले आहे. "पंजाबमधील अमृतसर येथील हरमंदिर साहिब म्हणजेच सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी गेलेले राहुल गांधी यांचा खिसा कोणी कापला आहे का?" असं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. "श्री हरमंदर साहिबमध्ये राहुल गांधींचा खिसा कोणी कापला? चरणजीत चन्नी, नवज्योत सिद्धू की सुखजिंदर रंधवा? या तिघांनाच झेड सिक्युरिटीने राहुल गांधींच्या जवळ जाण्याची परवानगी दिली होती. अपमानाच्या घटनेनंतर पुन्हा एकदा पवित्र स्थान हरमंदिर साहिबला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे का?" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी हरसिमरत कौर बादल यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "हरसिमरत जी, जर हे घडलं नाही तर अशा खोट्या बातम्या पसरवणं म्हणजे पवित्र गुरुघराचा अपमान आहे. निवडणुकीतील विरोध चालूच राहील पण तुम्ही जबाबदारी आणि समज दाखवावी. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात बसून काळ्या कायद्यांवर शिक्कामोर्तब करणे म्हणजे शेतकऱ्यांचे खिसे कापण्यासारखेच आहे" असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अमृतसरमध्ये गांधी यांचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू, मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी व काँग्रेसच्या उमेदवारांनी विमानतळावर स्वागत केले.
राहुल गांधी यांनी जलियांवाला बागेत जाऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. काँग्रेसने राज्याच्या 117 जागांच्या विधानसभेसाठी 109 उमेदवार जाहीर केले आहेत. राहुल गांधी पंजाबमध्ये यायच्या आधी पक्षाची तिसरी यादी जाहीर होईल, अशी आशा होती. हवामान अनुकूल नसल्यामुळे राहुल गांधी नियोजित वेळेनंतर अमृतसरमध्ये आले. राहुल गांधी अमृतसरमध्ये विमानतळावर आले तेव्हा पक्षाचे राज्यातील पाच खासदार मनीष तिवारी, रवणीत सिंग, जसबीर सिंग गिल, प्रिनीत कौर आणि मोहम्मद सादिक तेथे स्वागताला हजर नव्हते.