नवी दिल्ली - पाच राज्यांतील निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय पक्ष आणि नेतेमंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी आज पटियालामधील राजपुरा येथे एका जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी बोलताना राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल (Sukhbir Singh Badal) यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
"मी खोटी आश्वासने देणार नाही. जर कोणाला खोटी आश्वासने ऐकायची असतील तर त्यांनी पंतप्रधान मोदी, सुखबीर सिंग बादल आणि अरविंद केजरीवाल यांची भाषणे ऐकली पाहिजेत. मला फक्त सत्य बोलायला शिकवले गेले आहे" अशा शब्दांत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे. तसेच "माझ्याबद्दल दोन गोष्टी समजून घ्या, जेव्हा मी बोलतो तेव्हा विचारपूर्वकच बोलतो मग तुम्हाला आवडो अथवा न आवडो मी या व्यासपीठावरून खोटी आश्वासनं देणार नाही. पंजाबाला धोक्यापासून दूर ठेवायचे असेल तर सगळ्यांनी एकजुटीने चालायला हवं" असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
"कोरोनाच्या संकटात मोदींनी शेतकऱ्यांना वर्षभर रस्त्यावर सोडलं"
काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) हे विविध मुद्द्यांवरून भाजपा (BJP) आणि मोदी सरकारवर (Modi Government) हल्लाबोल करत असतात. याआधी राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला होता. "भारतात आज पंतप्रधान नसून एक असा राजा आहे, ज्याला वाटतं की तो निर्णय घेत असताना लोकांनी शांत बसावं" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच पंतप्रधान मोदींवर कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना एक वर्षभर रस्त्यावर सोडल्याचा गंभीर आरोपही केला आणि काँग्रेस असं कधीच करणार नाही, असं देखील म्हटलं होतं.
"काँग्रेस सत्तेत असताना शेतकर्यांसाठी आपले दरवाजे बंद करणार नाही"
मोदी सरकारवर टीका केली होती. मोदी सरकारने जशी वागणूक दिली तसा त्यांचा पक्ष शेतकर्यांशी कधीही वागणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले होते. "काँग्रेस सत्तेत असताना शेतकर्यांसाठी कधीही आपले दरवाजे बंद करणार नाही. आम्हाला शेतकरी, गरीब आणि मजूर यांच्यासोबत भागीदारी करून काम करायचे आहे जेणेकरून प्रत्येक विभागाला वाटावं की हे त्यांचे सरकार आहे" असं म्हणत सरकारला कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडणाऱ्या शेतकऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केलं होतं.