नवी दिल्ली: पंजाब विधानसभा निवडणुकीच्या (Punjab Election 2022) मतदानाचा दिवस जवळ येऊ लागला आहे, तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) हेच यापुढेही काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असे जाहीर केले आहे. यानंतर, प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी चन्नी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सिद्धूंनी स्वत:ला पंजाबचा आशिक असे संबोधले आहे. पंजाबचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदावर असलेले चरणजीत सिंग चन्नी यांची एकूण संपत्ती किती आहे, चरणजीत सिंग चन्नी यांची कमाई किती, ते जाणून घेऊया...
पंजाब विधासभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात चरणजीत सिंग चन्नी यांनी आपली एकूण संपत्ती ९.४५ कोटी असल्याचे म्हटले आहे. सन २०१७ च्या तुलनेत चन्नी यांची संपत्ती घटल्याचे दिसून येत आहे. सन २०१७ मध्ये चन्नी यांच्याकडे १४.५१ कोटी रुपयांची संपत्ती होती. सन २०२२ मध्ये चन्नी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे २.६२ कोटी रुपयांची चल आणि ६.८२ कोटी रुपयांची अचल संपत्ती असल्याचे म्हटले आहे.
चरणजीत सिंग चन्नी यांच्या पत्नीकडे किती संपत्ती?
चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे १.५० लाख रुपयांची रोकड तर पत्नी डॉ. कमलजीत कौर यांच्याकडे ५० हजार रुपये रोकड आहे. चन्नी यांच्या बँक खात्यात ७८.४९ लाख तर पत्नी कौर यांच्या खात्यात १२.७६ लाख रुपये जमा आहेत. चन्नी यांच्याकडे ३२.५७ लाखांची टोयोटा फॉर्च्युनर आहे. चन्नी यांनी ही कार २०१८ मध्ये खरेदी केली होती. तर पत्नीकडे दोन कार असून, एका कारची किंमत १५.७६ लाख आणि दुसऱ्या कारची किंमत ३०.२१ लाख रुपये आहे.
चन्नी यांच्या नावावर अनेक बंगले
चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे १० लाखांचे सोन्याचे दागिने असून, पत्नीकडे ५४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. तर, चन्नी यांच्या नावावर २६.६७ लाख रुपयांची एका पेट्रोल पंपात गुंतवणूक आहे. चन्नी यांच्याकडे कृषी आणि गैर-कृषीशिवाय अनेक बंगले असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच चन्नी यांच्यावर ६३.२९ लाख आणि पत्नीच्या नावे २५.०६ लाखांचे कर्ज आहे.
दरम्यान, चन्नीजी गरिबीतून वर आले आणि मोठे नेते झाले. ते मुख्यमंत्री झाले, तरी त्यांच्यात अहंकार दिस नाही, अशा भावना यावेळी राहुल गांधींनी व्यक्त केल्या. तसेच चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केल्यामुळे नवज्योतसिंग सिद्धूंची पिछेहट झाल्याची चर्चा होत आहे.