Punjab Election 2022 PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पंजाबमधील जालंधर येथील एका निवडणूक रॅलीला संबोधिक केलं. पंजाबमध्ये भाजपनं कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष, पंजाब लोक काँग्रेस आणि सुखदेव सिंग ढींडसा यांच्या पक्षासोबत युती केली आहे. पंजाबमध्ये सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली रॅली पार पडली. यापूर्वी फिरोजपूरमध्ये त्यांची निवडणूक रॅली होऊ शकली नव्हती. पंतप्रधानांनी आपल्या संबोधनादरम्यान राज्यात एनडीएचं सरकार स्थापन होणार असून राज्यात विकासाचा नवा अध्याय सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला.
"तुमच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि यात कोणतीही कमतरता जाणवणार नाही," असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिलं. तसंच यावेळी त्यांनी गांधी कुटुंबीयांवरही निशाणा साधला. काँग्रेसचं सरकतार एकाच कुटुंबाच्या रिमोट कंट्रोलवर चालत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
काँग्रेसवर निशाणाकाँग्रेसचं सरकार एका कुटुंबाच्या रिमोट कंट्रोलवर चालतं, असा आरोप पंतप्रधानांनी यावेळी केला. अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वातील सरकार चालवण्यात बाधा निर्माण करणं, सरकार रिमोट कंट्रोलनं चालवण्याचा प्रयत्न केल्यानंतर अमरिंदर सिंग यांना अपमानित करणं असा आरोपही त्यांनी काँग्रेसवर केला. आज तुम्ही काँग्रेसची स्थिती पाहा. या पक्षात फूट पडत आहे. त्यांचेच नेते त्यांना उघडं पाडत आहेत. ज्या पक्षात अंतर्गत लढाई असेल, तो पक्ष पंजाबला स्थिर सरकार देऊ शकत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
मंदिरात जायचं होतं पण..."आज माझी देवीच्या चरणी जाण्याची नमन करण्याची, आशीर्वाद घेण्याची इच्छा होती. परंतु या ठिकाणी प्रशासन आणि पोलिसांनी हात वर केले. आम्ही व्यवस्था करू शकत नाही. तुम्ही हेलिकॉप्टरनं जा असं त्यांनी सांगितलं," असं मोदी यावेळी म्हणाले.