नवी दिल्ली - पंजाब विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. येत्या 20 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील प्रचार शिगेला पोहोचला असून भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने जोरदार तयारी केली आहे. आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार चरणजीतसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी सणसणीत टोला लगावला आहे.
पंजाब निवडणुकांसाठी अमृतसरमध्ये आयोजित केलेल्या एका प्रचारसभेत बोलताना भगवंत मान यांनी काँग्रेसचा उल्लेख सर्कस असा केला होता. "काँग्रेस पक्ष आता पंजाबमध्ये एक सर्कस बनला आहे. चन्नीसाहेबांचा ते लढत असलेल्या दोन्ही मतदारसंघांमध्ये पराभव होणार आहे. आप त्यांचा पराभव करेल. ते जर आमदारच नसतील, तर ते कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत" असं म्हटलं होतं. त्याला टीकेला आता चरणजीत सिंग चन्नी यांनी एका कार्यक्रमात बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. "ही जर आमची सर्कस असेल, तर तिथे माकडाची जागा रिकामी आहे. त्यासाठी त्यांचं स्वागत आहे. त्यांना दाखल व्हायचं असेल तरी ते होऊ शकतात" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्यावर रोड शो दरम्यान हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. अमृतसर येथील अटारी भागातून भगवंत मान यांचा ताफा जात असतानाच लोक स्वागत करण्यासाठी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत होते. त्यावेळी अज्ञाताकडून त्यांच्यावर दगड भिरकावण्यात आला. यात ते जखमी झाले होते. कारचा सनरूफ उघडून भगवंत मान हे उभे राहिले होते व लोकांना अभिवादन करत ते पुढे चालले होते. लोक स्वागत करण्यासाठी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत होते. त्याचवेळी गर्दीतून अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्यावर दगड फेकण्यात आला. त्यात ते जखमी झाले. या घटनेनंतर उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार झाल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रचार सुरू केला होता.
दरम्यान, पंजाबमधील सर्व जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर निकाल 10 मार्चला लागणार आहेत. आम आदमी पार्टीकडून भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पंजाब विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे. आम आदमी पार्टीने लोकांची मते मागवून त्यानुसार हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती. दरम्यान, भगवंत मान हे पंजाबमधील संगरूर येथून दोनवेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत.