Punjab Election 2022: भय्यांना पंजाबमध्ये राज्य करू देणार नाही; मुख्यमंत्री चन्नींच्या उद्गारामुळे काँग्रेस अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 08:37 AM2022-02-18T08:37:11+5:302022-02-18T08:37:53+5:30
उत्तर प्रदेश, बिहार, दिल्लीतून भय्या लोक पंजाबमध्ये येऊन राज्य करू इच्छित आहेत. त्यांना पंजाबमध्ये घुसखोरी करू देऊ नका
एस. पी. सिन्हा
चंदीगड : उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली येथील रहिवाशांना (त्यांना भय्या या नावानेही संबोधले जाते.) पंजाबमध्ये आम्ही राज्य करू देणार नाही. उत्तर प्रदेशातील भय्यांना पंजाबमध्ये येऊ देणार नाही, असे वादग्रस्त उद्गार पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी एका प्रचारसभेत काढले. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, फुटीरतावादी मानसिकतेच्या काँग्रेसला पंजाबवर एक क्षणभरही राज्य करू देऊ नका.
पंजाबमध्ये येत्या रविवारी, २० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी एका प्रचारसभेत सांगितले की, प्रियांका गांधी या पंजाबच्या सून आहेत. त्यामुळे सर्व पंजाबी नागरिकांनी आपल्याच व्यक्तीच्या पक्षाला मत दिले पाहिजे. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्लीतून भय्या लोक पंजाबमध्ये येऊन राज्य करू इच्छित आहेत. त्यांना पंजाबमध्ये घुसखोरी करू देऊ नका. चन्नी यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रियांका गांधी हसल्या व त्यांनी टाळ्यादेखील वाजवल्या, असा आरोप होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदी नेत्यांवर चन्नी यांनी ही टीका केल्याची चर्चा आहे.
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर बिहारमध्ये गुन्हा दाखल
यूपी व बिहारमधील नागरिकांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्याविरुद्ध पाटण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, तर मुजफ्फरपूरच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी २४ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे. सामाजिक कार्यकर्ते तमन्ना हाशमी यांनी हा खटला दाखल केला आहे.