Capt Amarinder Singh : कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पराभव, आपच्या उमेदवाराने मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 01:19 PM2022-03-10T13:19:08+5:302022-03-10T13:22:13+5:30
Capt Amarinder Singh : माजी मुख्यमंत्री आणि पंजाबचे लोक काँग्रेस अध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग निवडणुकीत पराभूत झाले आहेत. या जागेवरून आम आदमी पार्टीचे अजित पाल सिंह कोहली विजयी झाले आहेत.
अमृतसर : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या (Punjab Election Result 2022) सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टी (AAP) मोठा विजय मिळवताना दिसत आहे. आम आदमी पार्टीची जवळपास 90 जागांवर आघाडी आहे. तर सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसची अवस्था वाईट आहे. काँग्रेस आतापर्यंत केवळ 18 जागांवर आघाडीवर आहे. तर अकाली दल 10 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर भाजपा मात्र निष्प्रभ दिसून येत आहे. दरम्यान, पटियाला येथून मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि पंजाबचे लोक काँग्रेस अध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग निवडणुकीत पराभूत झाले आहेत. या जागेवरून आम आदमी पार्टीचे अजित पाल सिंह कोहली विजयी झाले आहेत.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. आम आदमी पार्टीचे उमेदवार अजित पाल सिंह कोहली यांनी पटियाला अर्बन सीटवरून कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा जवळपास 14,000 मतांनी पराभव केला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग हे 4 वर्षांहून अधिक काळ पंजाबचे मुख्यमंत्री होते, त्यानंतर पक्षात अंतर्गत कलह वाढल्यामुळे काँग्रेसने त्यांच्याकडून राजीनामा घेतला होता. त्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वतःचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस स्थापन केला आणि या निवडणुकीत भाजपाशी युती केली होती. त्यावेळी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दावा केला होता की, आपण अनेक जागांवर निवडणूक जिंकू. परंतु या क्षणी ते स्वतःची जागा देखील वाचवू शकले नाहीत.
काँग्रेसमधून बाहेर पडण्यापूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांची गणना काँग्रेसच्या सर्वात मजबूत प्रादेशिक नेत्यांमध्ये केली जात होती. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेसने पंजाबमध्ये 117 पैकी 77 जागा जिंकल्या होत्या आणि तब्बल 10 वर्षांनंतर काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवून दिली होती. तेव्हा काँग्रेसने फक्त शिरोमणी अकाली दल किंवा भाजपाचाच पराभव केला नव्हता तर आम आदमी पार्टीची स्वप्नेही चिरडून टाकली होती.
दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंग हे पटियालाचे दिवंगत महाराजा यादविंदर सिंग यांचे पुत्र आहेत. लॉरेन्स स्कूल सनावर आणि देहरादूनच्या दून स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जुलै 1959 मध्ये NDA अर्थात राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये प्रवेश घेतला होता. डिसेंबर 1963 मध्ये तेथून त्यांनी पदवी प्राप्त केली आणि नंतर 1963 मध्ये ते भारतीय लष्करात सामील झाले होते. ते त्याच दुसऱ्या बटालियन शीख रेजिमेंटमध्ये तैनात होते.