चंदीगड : पंजाबमधील सर्व जागांचे कल आले आहेत. यामध्ये आम आदमी पार्टीला (आप) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री चरणजीत चन्नी, कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिद्धू यांच्यासह अनेक दिग्गज आपापल्या जागेवरून पिछाडीवर आहेत. दरम्यान, आम आदमी पार्टीचे नेते हरपाल सिंग चीमा (Harpal Singh Cheema) हे सध्या चर्चेत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर पंजाबमध्ये 'आपचे सरकार स्थापन झाले तर हरपाल सिंग चीमा यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते. निकाल जाहीर होण्यापूर्वी हरपाल सिंग चीमा म्हणाले होते की 'आप' राज्यात सरकार स्थापन करणार आहे आणि एक्झिट पोलवर शंका घेण्याचे कारण नाही. दरम्यान, सध्या पंजाबमध्ये 'आप'ला स्पष्ट बहुमत दिसत आहे. त्यामुळे निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेले भगवंत मान यांच्यासह उपमुख्यमंत्री पदासाठी हरपाल सिंग चीमा यांचे नाव चर्चेत आहे.
दरम्यान, 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत हरपाल सिंग चीमा यांनी अकाली दलाचे गुलजार सिंग मूनक आणि काँग्रेस नेते अजाइब सिंग रोतलान यांचा पराभव करून ही जागा जिंकली होती. आता ते पुन्हा त्याच जागेवरून निवडणूक लढवत आहेत. हरपाल सिंग चीमा हे पेशाने वकील आहेत. निवडणूक निकालाच्या एक दिवस आधी, हरपाल सिंग चीमा यांनी पंजाबमध्ये 'आप'ला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी हातमिळवणी केल्याचा आरोप केला. कॅप्टन अमरिंदर सिंग आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते 'आप'चे नेते हरपाल सिंह चीमा हे पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि संगरूर जिल्ह्यातील दिरबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. चीमा 2017 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आपमध्ये सामील झाले होते. त्यानंतर 2017 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत त्यांनी दिरबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. प्रसिद्ध पंजाबी कबड्डीपटू गुलजार सिंग मूनक यांच्या विरोधात ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मुनक यांनी शिरोमणी अकाली दलाच्या (एसएडी) तिकिटावर निवडणूक लढवली होती.