चंदिगड – आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान(AAP Bhagwant Man) यांच्यामुळे ७ वर्षापूर्वी दुरावलेले पिता-पुत्र यांची पुन्हा भेट झाल्याचं समोर आले आहे. विशेष म्हणजे हा भावूक क्षण भगवंत मान आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे त्याच गावात घडला आहे. शपथविधी सोहळ्याची सुरक्षा व्यवस्था पोलिसांकडून चोख आखण्यात आली आहे. शहीद भगत सिंग यांच्या गावात भगवंत मान हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. तत्पूर्वी ही सुखद घटना घडली आहे.
७ वर्षापूर्वी घर सोडून गेला होता मुलगा
फरिदाकोट जिल्ह्यातील देविंदर सिंग यांचा मुलगा जसविंदर सिंग ७ वर्षापूर्वी घरातून निघून गेले होते. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु काहीही थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर कुटुंबाने पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मात्र आजतागायत देविंदर सिंग यांना त्यांचा मुलगा सापडला नव्हता. त्यामुळे मुलगा गेला कुठे? हे कुणालाही न कळाल्याने ७ वर्ष हे कुटुंब मुलाची प्रतिक्षा करत होते.
शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी झाली भेट
नुकतेच पंजाबमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल(Punjab Election Results 2022) समोर आले. यात सर्वाधिक जागा पटकावत आम आदमी पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केला. आज मुख्यमंत्री म्हणून आपचे भगवंत मान शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला लाखो लोकं उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमस्थळी देविंदर सिंग यांचा मुलगा जसविंदर सिंग खुर्च्या लावताना दिसून आला. पंजाब सीमा भागातील राज्य असल्याने याठिकाणी नेहमी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येते. त्यामुळे शपथविधी सोहळ्याला कुठलंही गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रत्येक व्यक्तीची ओळख पटवून घेत आहे. याचवेळी जसविंदर सिंगची खरी ओळख समोर आली. नवांशहर ठाण्याचे एएसआय बलविंदर सिंग यांनी त्यांच्या घरी चौकशी केली तेव्हा त्यांचा मुलगा ७ वर्षापूर्वी घरातून पळाल्याचं उघड झालं.
कुटुंबाला झाला आनंद
कुटुंबाला ही माहिती मिळताच तातडीने त्यांनी शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी धाव घेतली. देविंदर सिंग यांनी जसविंदर सिंग याला पाहताच कडकडून मिठी मारली. सिंग कुटुंबाने पोलिसांचे आभार मानले. जसविंदर सिंग म्हणाले की, मी मागील ५ दिवसांपासून शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी काम करतोय. त्याआधी मी क्रॉकरीचं काम करत होतो. काही गोष्टीवरून माझा घरच्यांशी वाद झाला त्यामुळे मी नाराज होतो. म्हणून गेली ७ वर्ष मी घराकडे गेलो नाही असं त्यांनी सांगितले.