- हरीश गुप्ता, नवी दिल्ली
पंजाब विधानसभेसाठी दोन कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, तिथे काँग्रेसला विजयाची सर्वाधिक आशा आहे. भाजप नेते खासगी पराभव स्वीकारू लागले आहेत. हे लक्षात घेतच बहुधा पंतप्रधानांनी जालंधर व अमृतसरमध्ये सभांना नकार दिला होता. जाट शीख आयुष्याची अखेरची निवडणूक लढवीत असल्याचे सांगून कॅप्टन अमरिंदरसिंग (काँग्रेस) लोकांची सहानुभूती मिळवीत आहेत. भल्या पहाटेपासून त्यांचा प्रचार सुरू होतो. ते प्रत्येकाला सोबत घेण्याचा प्रयत्न करतात. काँग्रेस नेतृत्वाचाही त्यांना भक्कम पाठिंबा आहे. २०१२ च्या निवडणुकीहून यावेळी एकदम वेगळे चित्र आहे. तेव्हा काँग्रेसच दुभंगलेली होती. आता परिस्थिती पूर्णत: बदलली आहे. अकाली दलाविरुद्ध लोकांच्या मनात संताप असून, भाजपबाबतही सकारात्मक वातावरण नाही. त्यामुळे काँग्रेसला संधी निर्माण झाली. भाजपचे वरिष्ठ नेते आम्हाला फार फार तर दोन जागा मिळतील, असे सांगत आहेत.