Punjab Exit Poll Results 2022: 'या' एका राज्यानं वाढवलं मोदी-शहांचं टेन्शन; भाजपसमोर उभं राहतंय नवं आव्हान?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 10:23 PM2022-03-07T22:23:07+5:302022-03-07T22:23:49+5:30
Punjab Exit Poll Results 2022: काँग्रस, भाजपला जोरदार धक्का देणारा पक्ष; मोदी-शहांसमोर नवं आव्हान
चंदिगढ: पंजाब विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले आहेत. जवळपास सगळ्याच एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्ष वरचढ ठरताना दिसत आहे. अरविंद केजरीवालांचा आप दिल्लीबाहेर पहिल्यांदाच सत्ता स्थापन करेल अशी दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे आप थेट स्वबळावर सत्ता स्थापन करेल असा अंदाज आहे.
पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण ११७ जागा आहेत. सत्ता स्थापनेसाठी ५९ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. राज्यात आपला १०० हून अधिक जागा मिळतील, असा टुडेज चाणक्यचा अंदाज आहे. इंडिया टुडे-ऍक्सिस माय इंडियानं आपला ७६ ते ९० जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवली आहे. एबीपी-सी व्होटरनं ५१ ते ६१ जागांचा अंदाज वर्तवला आहे.
आधी दिल्लीत आपनं काँग्रेसला धक्का दिला. काँग्रेस तब्बल १५ वर्षांत दिल्लीत सत्तेत होती. मात्र आपच्या त्सुनामीनं काँग्रेसचा पालापाचोळा केला. २०१५ आणि २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. या दोन निवडणुकांत आपनं मुसंडी मारली. या दोन निवडणुकांत भाजपला अनुक्रमे ३ आणि ८ जागा मिळाल्या.
दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्येही आप काँग्रेसला धक्का देताना दिसत आहे. आप आणि काँग्रेसच्या कामाची पद्धत आणि विचारधारा बऱ्यापैकी सारखीच असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे आप काँग्रेसला पर्याय ठरताना दिसत आहे. एकीकडे काँग्रेस कमजोर असताना आप हातपाय पसरत आहे. त्यामुळे काँग्रेससमोरील अडचणी वाढल्या आहेत.
दुसरीकडे आपचं यश भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. आप काँग्रेस पाठोपाठ भाजपला थेट आव्हान देताना दिसत आहे. एक्झिट पोलचे आकडे खरे ठरल्यास दिल्ली पाठोपाठ पंजाबमध्येही भाजपची डोकेदुखी वाढेल. हिंदुत्व आणि राष्ट्रवाद या मुद्द्यांवर भाजपचा अधिक भर असतो. त्याला उत्तर देण्यासाठी आपचे संयोजक अरविंद केजरीवाल कधी हनुमान मंदिरात जातात, तर कधी दिल्लीतल्या शाळांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करतात. यातून आप थेट भाजपला आव्हान देत आहे. गुजरात, गोवा, उत्तराखंडमध्येही आपनं लक्ष्य केंद्रीत केलं आहे.