नवी दिल्ली - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती या दिवसागणिक वाढत आहेत. अशीच एक घटना आता पंजाबच्या अमृतसरमध्ये घडली आहे. पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेलगत पाकिस्तानी ड्रोनमधून दोन बॉक्स फेकण्यात आले. बॉक्स फेकल्याचा संशय येताच बीएसएफ (BSF) जवानांनी ड्रोनवर गोळीबार करत पाकिस्तानचा डाव उधळून लावला आहे. गोळीबारानंतर ड्रोन पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने निघून गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. शोध मोहीम सुरू असताना काही स्फोटकं देखील आढळून आली आहे.
पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून तेथील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच दरम्यान, पाकिस्तानने वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. पण बीएसएफ जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. बीएसएफच्या गुरुदासपूर सेक्टरमध्ये 73 बटालियनच्या जवानांना अमृतसर, पंजाबमधील अजनाला तहसीलमधील पंजग्राहियन सीमा चौकीवर ड्रोन दिसले. त्यानंतर सतर्क जवानांनी सीमेवरून उडणाऱ्या पाकिस्तानी ड्रोनवर गोळीबार केला आणि दहशतवादी प्रयत्न हाणून पाडला.
ड्रोनच्या माध्यमातून भारताच्या दिशेने काहीतरी फेकल्याचा बीएसएफ जवानांना संशय आला.मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास बीएसएफच्या पंजग्राहियन बीओपीवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांना पाकिस्तानी ड्रोन भारत-पाक सीमेवर उडताना दिसला.यानंतर सुरक्षेत तैनात जवानांनी ड्रोनवर गोळीबार सुरू केला. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे.
बीएसएफ जवानांनी ड्रोनवर गोळीबार केला
बीएसएफ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफ जवानांनी सीमेवर उडणाऱ्या ड्रोनवर गोळीबार केला आहे. ड्रोनच्या माध्यमातून भारताच्या दिशेने काही वस्तू फेकल्याचा संशय असून, दोन ठिकाणी स्फोटकं सापडली. आता मोठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. पाकिस्तानातून स्फोटक पदार्थ, शस्त्रे पाठवले जाण्याची भीती आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.