पंजाबमधील बहुतांश शेतकरी गहू पिकांवर अवलंबून आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांनी वेगवेगळी पिकं घेण्यास सुरुवात केली आहे. फरीदकोटमधील मानीसिंगवाला या छोट्याशा गावातील रहिवासी प्रदीप सिंग आणि त्यांच्या पत्नीने कमाल केली आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड सुरू केली. आता या पिकातून त्यांना दर 6 महिन्यांनी 5 लाख रुपयांचा नफा मिळू लागला आहे.
प्रदीप सिंग सांगतात की, "जेव्हा स्ट्रॉबेरीच्या लागवडीची कल्पना सुचली, तेव्हा सर्वप्रथम त्या ठिकाणी पोहोचलो जिथे हे पीक जास्त प्रमाणात घेतलं जातं. त्याबद्दल माहिती मिळवली. महाराष्ट्रातील पुणे शहरातून स्ट्रॉबेरीचं चांगलं पीक असलेली रोपं विकत घेतली. शेताच्या थोड्या भागात लागवड केल्यास चांगले परिणाम मिळतात. यानंतर आम्ही स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचा निर्णय घेतला."
"माझ्या या कामात माझ्या पत्नीचाही मोठा वाटा आहे. माझी पत्नी स्ट्रॉबेरी चांगल्या पद्धतीने पॅक करते. मी बाजारात नेतो. तिथे सर्व माल विकला जातो. एकूण खर्च काढल्यानंतर त्यांना पाच लाख रुपयांचा नफा होतो. इतर पिकांच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. याशिवाय आम्ही शेतात स्ट्रॉबेरीसह मिरची आणि कांद्याचीही लागवड केली आहे."
प्रदीप सिंग यांनी इतर शेतकऱ्यांना पारंपरिक शेती सोडून फायदेशीर पिके घेण्याचा सल्ला दिला. शेतकऱ्याची पत्नी कुलविंदर कौर यांनी सांगितलं की, माझ्या पतीने ही स्ट्रॉबेरीची लागवड माझ्यासोबत सुरू केली. त्यांनी मला शेतात काम करायला सांगितल्यावर मी लगेच हो म्हणालो. मी पण एका शेतकऱ्याची मुलगी आहे आणि लहानपणापासून शेतात राहते. माझी शेतात काम करायला काही हरकत नाही. सध्या स्ट्रॉबेरीच्या शेतीतून गावातील इतर महिलांनाही आम्ही रोजगार देत आहोत. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.